Marathi Language Row: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषेवरून वाद सुरू आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा आदेश जारी केल्यानंतर याला सुरुवात झाली होती. पुढे विविध क्षेत्रातून याला विरोध झाल्यानंतर सरकारने हा आदेश रद्द केला होता. त्यानंतर मुंबईतील काही भागात मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांना कथित मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
अशात आता या वादावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन कारण मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची आहे. इतर दोन भाषा तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या गरजेनुसार असायला हव्यात. तुम्ही कुठेही राहा, स्थानिक भाषा आणि तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाची भाषा शिका. पण, हा नागरिकांचा वैयक्तिक निर्णय असायला पाहिजे.”
“भारतातील सर्वच भाषा उत्तम आहेत. देशात असंख्य भाषा आहेत, त्यामुळे तुम्हा किती भाषा येतात हे महत्त्वाचे नाही. भाषा द्वेष किंवा श्रेष्ठतेचे साधन असू नये. ती संवादाची भाषा असली पाहिजे. मी सर्वांना भारतातील प्रत्येक भाषा शिकण्यास प्रोत्साहित करते, ज्यामध्ये खूप मोठे साहित्य आहे. जरी भारतीय साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले गेले असले तरी, आपण सर्व एकच आहोत.”
मराठी भाषेबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, “मराठीमध्येही इतर भाषांप्रमाणेच संकल्पना आहेत. त्यामध्ये वेगळेपणा आहे. कारण मुघलांना विरोध करणारे शेवटचे साम्राज्य मराठा साम्राज्य होते. त्यामुळे इतिहासाचा हा भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे.”
कोण आहेत प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित?
शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती. शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
शांतिश्री या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी १९८६ मध्ये एम.फिल. आणि १९९० मध्ये पीएच.डी. मिळवली. यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.
शांतिश्री यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तेव्हा त्यांची आई तिथल्या लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू विषयांची प्राध्यापक होत्या.