पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशात रोजगार क्षमतेत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. ‘इंडिया स्किल्स’च्या सर्व्हेतील आकडेवारीनं ही आनंदाची लाट आली आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या सुरुवातीला म्हणजेच युपीए सरकारच्या काळात रोजगार क्षमता ३३.९ टक्के होती. ती ४०.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. देशात मंदीची लाट आल्याच्या बोंबा ठोकत रोजगारात घट झाल्याचे म्हणणारे तोंडावर आपटले आहेत, असंच या आकडेवारीवरून दिसतं.
२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत २०१५ मध्ये रोजगार क्षमता ३७.२ टक्के होती. २०१६ मध्ये त्यात ३८.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रोजगार क्षमतेत महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. सर्व्हेक्षणानुसार, ४१ टक्के महिला नोकरी मिळवू शकतात. तर ४० टक्केच पुरुष नोकरी मिळवू शकतात.
हा सर्व्हे पिपल स्ट्रॉंग, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, लिंक्डइन, यूएनडीपी, व्हीबॉक्स, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या सहकार्यातून करण्यात आला आहे. रोजगार क्षमता जाणून घेण्यासाठी देशभरातील २९ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशातील तीन हजार कॅम्पसमध्ये १५ जुलै आणि ३० ऑक्टोबरला सर्व्हे करण्यात आला. जवळपास ५.२ लाख लोकांनी त्यात भाग घेतला होता.
रोजगारात महाराष्ट्र अव्वल, पुण्याला सर्वाधिक पसंती
देशात रोजगार देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. बेंगळुरू आणि पुणे ही दोन शहरांना अधिक पसंती दिली जाते.