पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरुंवर टीका केली. लोकसभेत आणि राज्यसभेत त्यांनी जे भाषण केलं. त्याची चर्चा होते आहे. पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी हे देशातल्या लोकांना आळशी समजत होते. असंही वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. रिकामी भांडी रिकामी आश्वासनं असं म्हणत त्यांनी या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
काय आहे प्रकाश राज यांची पोस्ट?
रिकामी भांडी.. रिकामी आश्वासनं.. जेव्हा तुमच्याकडे भविष्याबद्दल बोलायला काही नसतं तेव्हा तुम्ही भूतकाळात जाता. असं म्हणत प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. पंडित नेहरु हे आरक्षण विरोधी होते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलं होतं. त्याच वाक्याचा संदर्भ घेऊन प्रकाश राज यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. रिकामी भांडी खूप आवाज करतात या उक्तीनुसार त्यांनी रिकामी भांड्यांचा संदर्भ देत मोदींवर टीका केली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना मोदींनी पुन्हा काँग्रेस आणि नेहरूंच्या धोरणावर हल्ला केला. ब्रिटिशकालीन गुलामगिरीच्या मानसिकतेतून काँग्रेसने देशात सत्ता राबवली. त्यामुळेच जगाने भारताकडे कुत्सित नजरेने पाहिले. काँग्रेसचा विचार कालबाह्य आणि नकारात्मक असून वॉरंटी संपलेल्या या पक्षाचे देश कदापि ऐकणार नाही. उलट, मतदार गॅरंटीवर विश्वास असलेल्या पक्षाला (भाजपा) पुन्हा सत्ता मिळवून देईल’, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
हे पण वाचा- “मी काही फालतू चित्रपट फक्त…”, प्रकाश राज यांचं व्यावसायिक सिनेमांमध्ये काम करण्याबाबत विधान
आरक्षणावरून पुन्हा नेहरू लक्ष्य
‘मी कुठल्याही आरक्षणाला पाठिंबा देत नाही. सरकारी नोकरीत तर कधीही नाही. आरक्षणामुळे अकुशलता वाढेल, असे पत्र नेहरूंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहून आरक्षणविरोधी भूमिकेचे समर्थन केले होते. दलित, आदिवासी, ओबीसींना नोकरीमध्ये आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर खालावेल, असा दावा नेहरूंनी केला होता, असे मोदी म्हणाले. सरकारी नोकऱ्यांमध्ये वरिष्ठ ओबीसी अधिकारी का नाहीत, असा प्रश्न राहुल गांधींनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देत, या प्रश्नाचे मूळ नेहरूंच्या आरक्षणविरोधी धोरणात असल्याची टीका मोदींनी केली. नेहरूंनी या समाजाची सरकारी भरती केली असती तर आत्तापर्यंत ओबीसी वरिष्ठ अधिकारपदावर पोहोचले असते. नेहरूंचे म्हणणे काँग्रेससाठी काळय़ा दगडावरील रेघ होती आणि हीच काँग्रेसची मोठी चूक होती, असा दावा मोदींनी केला होता. त्यावरुन आता प्रकाश राज यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.