Jammu-Kashmir : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील भारतीय सैन्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अखेर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि पाकिस्तान आणि भारतातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीरच्या शुक्रू केलर परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोध मोहीम राबवली असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. सध्या सुरक्षा दलांनी शुक्रू केलर परिसरात घेराव बंदी करत दहशतवांच्या विरोधात शोध मोहिम हाती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा दलाची कारवाई
शोपियान जिल्ह्यातील एका परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं असून शोध मोहीम राबवली जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा दलाकडून पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रू केलर परिसरात घेराव दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, या परिसराला सुरक्षा दलाने वेढा देत दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.