गुन्हेगारांचा नायनाट करण्याकरता उत्तर प्रदेश सरकार एन्काऊंटर मोहीम राबवत असल्याचं सातत्याने समोर येत असतं. आता, खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत झालेल्या एन्काऊंटरची आकडेवारीच जाहीर केली आहे. मधल्या काळात अतिक मोहम्मदचा मुलगा असद मोहम्मदचा एन्काऊंटर झाल्यानंतर हे प्रकरण देशभर गाजलं होतं. त्यानतंरही उत्तर प्रदेशात सातत्याने एन्काऊंटर झाले.

“आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शुन्य संवेदनशील धोरण राबवलं आहे. मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या सहा वर्षांच्या कालावधीत आम्ही १९० गुन्हेगारांना एन्काऊंटरमध्ये मारलं आहे. तर या चकमकीत ५ हजार ५९१ गुन्हेगार जखमी झाले आहेत. १६ पोलिसांनाही या चकमकीत वीरमरण प्राप्त झालं आहे. तर, १४७८ पोलीस जखमी झाले आहेत”, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ते पोलीस स्मारक दिनानिमित्त लखनऊमध्ये बोलत होते. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील एन्काऊंटर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण सर्वाधिक गाजलं होतं. विकास दुबे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला मारलं. तर, कुख्याक गँगस्टर अतिक मोहम्मदचा मुलगा असद मोहम्मद यालाही पोलिसांनी चकमकीत मारलं होतं. तसंच, अतिक आणि त्याचा भाऊ पोलीस कस्टडीत असताना हल्लेखोरांच्या हल्ल्यात मारले गेले.