नवी दिल्ली : ‘‘ऊर्जा सुरक्षेला देश सर्वोच्च प्राधान्य देतो. ऊर्जेच्या जागतिक बाजारपेठेत याची अतिशय स्पष्ट जाणीव असणे महत्त्वाचे आहे. ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या असतील, त्या आम्ही करू,’’ असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
युरोपीय महासंघाने (ईयू) रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करून नवे निर्बंध नुकतेच लादले. त्यात गुजरातमधील वाडिनार प्रकल्पावरही निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर मिस्राी यांनी हे वक्तव्य केले. ऊर्जेच्या संदर्भात दुटप्पीपणा नसावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन आणि मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मिस्राी यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘ईयू’ने रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करताना निर्बंध लागू केले आहेत. पंतप्रधान मोदींबरोबरील चर्चेत ब्रिटनमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल का, असा प्रश्न मिस्राी यांना विचारण्यात आला. त्यावर मिस्री यांनी ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले.
ऊर्जा क्षेत्राच्या जागतिक बाजारपेठेच्या संदर्भात जागतिक स्थिती सध्या कशी आहे, याबाबत स्पष्ट दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. भारताने गेल्या काही वर्षांत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढविली आहे. युक्रेन युद्धावरून पाश्चिमात्य देशांनी रशियावर घातलेल्या निर्बंधांची पर्वा न करता भारत रशियाकडून तेलखरेदी करीत आहे. युरोपीय संघाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांमध्ये रशियातून कच्च्या तेलाची खरेदी करून अन्य देशाने तयार केलेल्या विविध पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीवरही बंदीचा समावेश आहे.