पीटीआय, मुंबई
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या कंपन्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत सुरू केलेली शोध कारवाई शनिवारी तिसऱ्या दिवशी सुरू राहिली. अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान अनेक दस्तऐवज आणि संगणकीय उपकरणे सापडल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
तीन हजार कोटी रुपयांच्या बँकेच्या कर्जाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आणि कोट्यवधी रुपयांच्या वित्तीय अनियमिततांचे आरोप याची चौकशी करण्यासाठी ईडीने २४ जुलैला अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांविरोधात छाप्यांची कारवाई सुरू केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ही शोध कारवाई सुरू करण्यात आली असून मुंबईतील ३५पेक्षा जास्त ठिकाणी शोध घेतला जात आहे असे सूत्रांनी सांगितले.
अनिल अंबानींच्या मालकीच्या समूह कंपन्यांनी २०१७ ते २०१९ या कालावधीत येस बँकेकडून साधारण तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ती रक्कम बेकायदा पद्धतीने अन्य कामांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे.
या समूहाच्या ‘रिलायन्स पॉवर’ आणि ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ या दोन कंपन्यांनी गुरुवारी रोखे बाजाराला या कारवाईबद्दल कळवले आहे. मात्र, या कारवाईचा आपले व्यावसायिक कामकाज, आर्थिक कामगिरी, समभागधारक, कर्मचारी आणि अन्य संबंधितांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे.