इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रामायण पठणाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं. “मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे,” असं मत ऋषी सुनक यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

ऋषी सुनक यांनी या कार्यक्रमात आपल्या मनोगताची सुरुवात ‘जय सिया राम’ असं म्हणत केली. ते म्हणाले, “भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंब्रिज विद्यापीठात आयोजित मोरारी बापू यांच्या राम कथेला उपस्थित राहणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आज मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून उपस्थित नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे.”

“मला आपली श्रद्धा धाडस, हिंमत आणि ताकद देते”

“माझ्यासाठी श्रद्धा ही खूप व्यक्तिगत गोष्ट आहे. ही श्रद्धा मला जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन करत असते. पंतप्रधान होणं ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे, पण हे सोपं काम नाही. या पदावर असताना खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात. कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी देशासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी मला आपली श्रद्धा धाडस, हिंमत आणि ताकद देते,” असं मत ऋषी सुनक यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : मुस्लीम मुलीशी लग्न करा आणि रोख ११ हजार रुपये बक्षिस मिळवा; हिंदू धर्म सेनेची हिंदू मुलांना ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्यासाठी भगवान राम कायमच प्रेरणा देणारे”

“माझ्यासाठी भगवान राम कायमच प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्याकडून मला धाडसाने जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, माणूसकीने सरकार चालवण्यासाठी आणि निस्वार्थपणे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते,” असंही ऋषी सुनक यांनी नमूद केलं.