EU sanctions on Rosneft युरोपियन युनियनने शुक्रवारी रशियन ऊर्जा क्षेत्रातील रोझनेफ्टच्या भारतीय तेलशुद्धीकरण कारखान्यावर(रिफायनरी) निर्बंध लादले आणि तेलाच्या किमती कमी केल्या. युरोपियन युनियनने रशियाविरोधातील निर्बंधांची घोषणा केली. त्यात भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिंगल-साइट ऑइल रिफायनरी असलेल्या नायरा एनर्जीच्या वादिनार रिफायनरीवर निर्बंध लादले असल्याची घोषणा युरोपियन युनियनच्या उपाध्यक्षा काजा कल्लास यांनी केली. रशियाच्या सरकारी मालकीच्या रोझनेफ्टकडे या रिफायनरीत ४९ टक्के वाटा आहे. नवीन निर्बंध पॅकेजमध्ये पश्चिम युरोपला नैसर्गिक वायू पुरवणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनवरही बंदी घालण्यात आली आहे.

रशियाविरोधातील नवीन निर्बंध

रशियावरील नवीन निर्बंधांमध्ये, बँकिंग निर्बंध आणि रशियन कच्च्या तेलापासून तयार केल्या जाणाऱ्या इंधनांवरही निर्बंध लादण्यात आले आहे. कमी केलेल्या तेलाच्या किमतीची मर्यादा सध्या प्रति बॅरल ६० डॉलर्स आहे, याचाच अर्थ रशियाला भारतासारख्या खरेदीदारांना कमी दराने त्यांचे कच्चे तेल विकावे लागेल. सध्या भारत रशियन तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. त्यामुळे भारताला या निर्णयाचा फायदा होणार आहे. सध्या भारताच्या एकूण तेल आयातीपैकी जवळजवळ ४० टक्के तेल रशियातून आयात केले जाते.

“पहिल्यांदाच, आम्ही भारतातील सर्वात मोठ्या रोझनेफ्ट रिफायनरीवर निर्बंध लादत आहोत,” असे युरोपीय युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. रोझनेफ्टकडे नायरा एनर्जी लिमिटेडमध्ये ४९.१३ टक्के वाटा आहे, जो पूर्वी एस्सार ऑइल लिमिटेडकडे होता. नायरा गुजरातमधील वादिनार येथे प्रतिवर्षी २० दशलक्ष टन तेल शुद्धीकरण करते आणि ६,७५० हून अधिक पेट्रोल पंप चालवते.

निर्बंधांचा परिणाम काय?

युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे नायरा एनर्जी लिमिटेड युरोपियन देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन निर्यात करू शकत नाही. कल्लास म्हणाल्या की, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. युरोपियन युनियनने रशियाविरोधात आतापर्यंतच्या सर्वात मजबूत निर्बंध पॅकेजला मंजुरी दिली आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही रशियाच्या युद्ध बजेटमध्ये आणखी कपात करत आहोत आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करत आहोत, तसेच रशियन बँकांना निधी उपलब्ध करून देण्यावरही मर्यादित आणत आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनवरही बंदी घालण्यात आली आहे. “आम्ही रशियाच्या लष्करी उद्योगावर निर्बंध टाळण्यास मदत करणाऱ्या चिनी बँकांवर अधिक दबाव आणत आहोत,” असे कल्लास म्हणाल्या. “आम्ही खर्च वाढवत राहू, त्यामुळे आक्रमकता थांबवणे हा रशियापुढील एकमेव मार्ग आहे.” युरोप भारतातून डिझेल आणि पेट्रोलसारखे इंधन आयात करतो. भारतीय रिफायनर्स सामान्यतः मोठ्या प्रमाणात रशियन क्रूड खरेदी करतात, जे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांमध्ये रिफाइन केले जाते आणि युरोपियन युनियनला निर्यात केले जाते. मात्र, आता या निर्णयाचा डिझेल आणि पेट्रोल निर्यातीवर परिणाम होणार आहे.