scorecardresearch

युरोपीय महासंघ रशियाविरुद्ध संघटित

रोपीय महासंघाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सोमवारी युक्रेनच्या समर्थनार्थ आपल्या संकल्पाचे नव्याने प्रदर्शन केले.

ब्रुसेल्स : युरोपीय महासंघाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सोमवारी युक्रेनच्या समर्थनार्थ आपल्या संकल्पाचे नव्याने प्रदर्शन केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा युक्रेनवर हल्ला करण्याचा इरादा आहे की काय, या मुद्दय़ावर निर्माण झालेला तणाव पाहता आपल्या किनाऱ्याजवळ रशियाच्या युद्धसदृश कवायती स्वीकारार्ह नाहीत, असा इशारा आर्यलडने दिला.

‘युरोपीय महासंघाचे सर्व सदस्य एकत्र आहेत. युक्रेनमधील परिस्थितीबाबत आम्ही अमेरिकेशी मजबूत समन्वय राखून अभूतपूर्व ऐक्याचे प्रदर्शन करत आहोत’, असे महासंघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी ब्रुसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.

अमेरिकेचे अनुकरण करून युरोपीय महासंघ युक्रेनमधील युरोपीय राजदूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तेथून परतण्याचा आदेश देईल काय असे विचारले असता, ‘आम्ही त्यांचे अनुकरण करणार नाही’, असे उत्तर बोरेल यांनी दिले. या निर्णयाबाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याकडून ऐकण्यास आपण उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

कीवमधील आपल्या दूतावासातून काही राजनैतिक अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांना आपण माघारी बोलवत असल्याचे ब्रिटननेही सोमवारी जाहीर केले. ‘रशियाकडून असलेल्या वाढत्या धोक्याला प्रतिसाद म्हणून’ ही कार्यवाही करण्यात आल्याचे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले.

आर्यलडच्या नैऋत्य किनाऱ्यापासून २४० किलोमीटर अंतरावर, आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत, मात्र आपल्या देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात युद्धसदृश कवायती करण्याचा रशियाची योजना असल्याची माहिती आपण आपल्या समपदस्थांना देणार आहोत, असे युरोपीय महासंघाच्या बैठकीसाठी ब्रुसेल्समध्ये आगमन झालेले आर्यलडचे परराष्ट्रमंत्री सायमन कोवेने यांनी सांगितले.

‘ही घडामोड थांबवण्याची आमची ताकद नाही, मात्र ही बाब नक्कीच स्वागतार्ह नसल्याचे मी आर्यलडमधील रशियन राजदूताकडे स्पष्ट केले आहे’, असे कोवेने म्हणाले. ‘युक्रेनच्या बाबतीत आणि युक्रेनमध्ये जे काही घडते आहे, त्याच्या संदर्भात लष्करी हालचाली व तणाव वाढवण्याची ही वेळ नाही’, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.

पूर्व युरोपात नाटोच्या युद्धनौका, लढाऊ विमाने

वृत्तसंस्था, ब्रुसेल्स : रशियाने युक्रेनच्या सीमेवर लष्करी मोर्चेबांधणीचे काम सुरूच ठेवल्याने नाटोने पूर्व युरोपात युद्धनौका आणि लढाऊ जेट विमाने पाठविली आहेत.बाल्टिक समुद्राच्या भागात आपली संरक्षणात्मक फळी मजबूत केली जात असल्याचे नाटोने स्पष्ट केले आहे. नाटो ही ३० देशांची लष्करी संघटना असून त्यापैकी अनेक सदस्य देशांनी आपले सैनिक आणि शस्त्रसामग्री या भागात पाठविण्याची तयारी नाटोकडे दाखविली आहे. स्पेनने नाटोच्या तैनात ताफ्यासाठी आपली जहाजे पाठविली आहेत. बल्गेरियातही आपली लढाऊ विमाने पाठविण्याची स्पेनची तयारी आहे.

 नाटोतर्फे सोमवारी सांगण्यात आले की, अतिरिक्त सैन्य राखीव ठेवण्यात आले आहे. रशियाने युक्रेननजीक लष्कराची जमावजमव सुरूच ठेवल्याने नाटोच्या आणखी काही युद्धनौका आणि लढाऊ विमाने पूर्व युरोपात पाठविली जात आहेत.

युक्रेनमधील अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय माघारी

वॉशिंग्टन : रशियाच्या आक्रमक हालचालींमुळे युक्रेनवर युद्धाचे ढग जमा झाल्याचे चित्र असतानाच युद्धभयातून अमेरिकेने युक्रेनच्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशिया युक्रेनविरोधात मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा अहवाल आहे. मात्र रशियाच्या परराष्ट्र विभागाने आरोप केला आहे की, नोटो राष्ट्रे ही चुकीची माहिती पसरवून युक्रेनच्या भूभागात तणावाचे वातावरण निर्माण करीत आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने रविवारी आपल्या युक्रेनच्या दूतावासातील सर्व अमेरिकी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना युक्रेन सोडण्याचा आदेश दिला. युक्रेनवर रशियाचे आक्रमण होण्याची शक्यता वाढल्याने हा आदेश देण्यात आला आहे. कीव्हमधील अमेरिकी दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी युक्रेन सोडून गेलेच पाहिजे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: European union united against russia over ukraine zws

ताज्या बातम्या