नवी दिल्ली : नवनवीन तंत्रज्ञानाचा समाजावर आणि श्रम बाजारपेठेवर काय परिणाम होतो याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. या तंत्रज्ञानाचा परिणाम कामाच्या संधीवर होता कामा नये याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय मजदूर संघाच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे त्यांच्या नियोक्त्यांकडून शोषण होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी यासाठी या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिष्टमंडळे आणि विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याच्या वापराबद्दल असलेल्या शंका याबद्दल भागवत म्हणाले की, ‘‘जेव्हा नवे तंत्रज्ञान येते तेव्हा ते आपल्याबरोबर काही प्रश्न घेऊन येते. बेरोजगारीचे काय होणार? त्याने बेरोजगारी कमी होईल की वाढेल?’’ तसेच तंत्रज्ञान नाकारता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानामुळे मनुष्य स्वभाव काहीसा कठोर होतो आणि त्याला श्रमाबद्दल वाटणारा आदर काही प्रमाणात कमी होतो असे मतही भागवत यांनी व्यक्त केले. नव्या तंत्रज्ञानाने समाजात नवीन समस्या निर्माण करण्याऐवजी आनंद निर्माण केला पाहिजे अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी यावेळी बोलून दाखवली.
तंत्रज्ञान नाकारता येणार नाही. नवे तंत्रज्ञान येणारच. पण ते कसे हाताळायचे आणि त्याचा श्रम क्षेत्रावर परिणाम होणार नाही याची खबरदारी कशी घ्यायची याचा विचार करणे आवश्यक आहे.– मोहन भागवत, सरसंघचालक