ईव्हीएम मशीनमध्ये सातत्याने घोटाळा होत आहे अशी ओरड विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. पुढील निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग नवीन मशीन खरेदी करणार आहे. या नव्या मशीन्सचे वैशिष्ट्य असे की जर कुणी या मशीनला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर ही मशीन आपोआप बंद पडणार आहे. त्यामुळे कुणालाच या मशीनमध्ये काही बदल करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या मशीन्स खरेदी करण्यासाठी एकूण १,९४८ कोटी रुपये खर्च लागणार आहे. या मशीन एम ३ टाइपच्या मशीन्स असून यामध्ये सेल्फ डायग्नोस्टिक ऑथेंटिकेशन प्रणाली आहे असे सांगण्यात आले आहे. जुन्या मशीनला १५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे नव्या मशीन आणणे आवश्यक आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले. २०१९ च्या आधी या मशीन्सची खरेदी पूर्ण होणार आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी नव्या मशीन वापरण्यात येणार आहे.
If what EC said 1 Week back, that Indian EVMs most secure, reliable and tamper-proof, was true, why does it now have to buy tamper proof EVM pic.twitter.com/eOExJQfQeQ
— Joy (@Joydas) April 2, 2017
ज्या वेळी निवडणूक आयोगाने ही घोषणा केली तेव्हापासून ट्विटरवर या विषयी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जुन्या मशीनमध्ये काही काळेबेरं नव्हतं तर नव्या मशीन का खरेदी केल्या जात आहे असे एका जणाने म्हटले आहे. ईव्हीएममध्ये काही बदल होऊ नये म्हणून जर नवे मशीन घेतले जात असतील तर जुन्या मशीनमध्ये बदल करता येतात असे निवडणूक आयोगाने मान्य केले समजावे का असा प्रश्न एका जणाने विचारला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे असे सिद्ध होते की सध्या वापरात असलेल्या मशीनसोबत छेडछाड करता येऊ शकते असे एकाने म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील भिंड येथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यावेळी ईव्हीएम मशीनची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी दोन वेगवेगळी बटणे दाबली असता केवळ कमळालाच मतदान पडल्याचे दिसले. या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.