Ex-diplomat on US President Donald Trump softened tone towards India : भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव चांगलाच वाढला होता. पण अचानाक डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर नरमला आहे. यावर एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याने महत्त्वाचे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा फारसा प्रभाव दिसून न आल्यामुळेच ट्रम्प यांनी भारताबाबत मवाळ भूमिका घेतली, असे मत भारताचे माजी राजनैतिक अधिकारी के. पी फॅबियन यांनी रविवारी व्यक्त केले.

फॅबियन म्हणाले की, ट्रम्प यांना आता लक्षात आले आहे की, भारताबरोबरची त्यांची आक्रमक व्यापार रणनीती, विशेषतः रशियन तेल खरेदीच्या कारणाने अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादणे, ज्यामुळे भारतावरील एकूण व्यापार शुल्क ५० टक्के झाले, याचे “अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळाले नाहीत”, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

दरम्यान ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका-भारत संबंध हे अत्यंत खास नाते असल्याचे म्हटले आहे. आणि याबरोबरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वैयक्तिक नाते असल्याचेही म्हटले आहे. तर यावर मोदींनी देखील ही भावाना दोन्ही बाजूंनी एकसारखीच असल्याचे उत्तर दिले होते.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या मला त्यांची काही धोरणे आवडत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी असे क्षण येतात.”

तर पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका संबंधाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सकारात्मकता दाखवली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभार. आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि भविष्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन यामध्ये भारत आणि अमेरिका खूप सकारात्मक आहे.”

फॅबियन यांचे म्हणणे काय?

फॅबियन यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “एका मैत्रीपूर्ण ट्विटला प्रतिसाद म्हणून जे योग्य होते तेचे मोदींनी केले, पण यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही की, ज्याला मी ‘ट्रिपल टी’ – ‘ट्रम्प्ड-अप ट्रम्प टॅरिफ’ म्हणतो, याचा लवकर शेवट होईल. ‘ट्रम्प्ड-अप’ म्हणजे आधारहीन,” असे ते एएनआयशी बोलताना म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, हे अगदी स्पष्ट झाले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत शरणागती पत्करेल असे वाटत होते, पण हा समज चुकीचा होता हे आता त्यांना लक्षात येण्यास सुरूवात झाली आहे.

“त्यांना हे लक्षात घेतले पाहिजे की… भारत हे एक सिव्हिलायजेशनल स्टेट आहे… भारताला सर्वांबरोबर मैत्री करायची आहे आणि व्यापारही करायचा आहे, पण भारत हा कोणाचेही वर्चस्व स्वीकारणार नाही,” असे फॅबियन म्हणाले.