Ex-IITian Viral post on going back to US : अमेरिकेत राहाणारी एक भारतीय वंशीची महिला देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी भारतात परतली, पण येथील परिस्थिती पाहून तिने पुन्हा एकदा परत अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी या एकूणच अनुभवाबद्दल या महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) पुद्दुचेरी या नामांकित संस्थांच्या माजी विद्यार्थिनी डॉ. राजेश्वरी अय्यर यांनी एक्सवर ही पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भारत सोडून अमेरिकेला परत जाण्याची कारणे सांगितली आहेत. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.. त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं की त्यांना जे अपेक्षित होतं आणि प्रत्यक्षात जे दिसलं त्यामधील फरकाने त्यांना कायमचे अमेरिकेत परतण्यास भाग पाडले.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“प्रत्येक भारतीयाचे अंतिम ध्येय भारत सोडणे आहे,” असे लोक म्हणायचे तेव्हा मला ते मजेदार वाटायचे. काही वर्षांपूर्वी मी अमेरिका सोडली आणि आशा आणि कर्तव्याच्या जाणीवेने परत आले. मला मनापासून येथे एक आयुष्य उभं करायचं आणि योगदान द्यायचं होतं. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळं होतं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “लोक डोळे झाकून चुकीच्या निर्णयांचे समर्थन करत होते. जास्तीचे कर, योग्यतेचा अभाव आणि अनियंत्रित भ्रष्टाचार यांचे कौतुक करत होते. हे असं वाटलं की समाज स्वतःच्याच पतनाला समर्थन देत आहे. अखरे मी सामान आवरले आणि यावेळी स्पष्टता घेऊन निघाले. आणि खरं सांगायचं तर मला इतकी शांती कधीही वाटली नव्हती.”

“भारत नेहमीच माझ्या हृदयात राहील. पण मी माझ्या मुलांना द्वेष, गोंगाट आणि इच्छेने बाळगलेलं अज्ञान असणाऱ्या वातावरणात वाढवण्यास नकार देते,” असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अखेरीस म्हटले आहे.

या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पोस्टवर शेकडो कमेंट करण्यात आल्या आहे ज्यामध्ये अनेकांनी भारत सोडण्याच्या निर्णयात त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. निर्णय योग्य आणि वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. एका वापरकर्त्याने स्वतःच्या कुटुंबासाठी शांतता निवडण्याकरिता कारणे द्यायची आवश्यता नाही.

तर काही वापरकर्त्यांनी मात्र निघून जाण्याचा पर्याय निवडल्याने समस्या संपणार नाहीत, त्यांना सोडवण्यासाठी पत यावे लागेल असे म्हटले आहे. आपण कुठपर्यंत पळत रागाणार? तुमच्यासारख्या लोकांनी येथे राहून लढा देण्याची आवश्यकता आहे, असे एका युजरने म्हटले आहे.