लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणनीती ठरविणारे प्रशांत किशोर यांना भाजपपासून दूर केल्याच्या वृत्ताचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इन्कार केला आहे. प्रशांत किशोर यांनीच आपल्यासमवेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तेव्हापासून ते काम करीत आहेत, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर हे बिहारचे रहिवासी आहेत, सहा-सात महिन्यांपूर्वी ते आपल्याला भेटले आणि त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासून ते आपल्यासाठी काम करीत आहेत, ते बिहारचे नागरिक असल्याने आपण स्वारस्य दाखविले, असे नितीशकुमार यांनी  सांगितले. प्रशांत किशोर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, किशोर यांनी आपल्या प्राथमिक कामाला सुरुवातही केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील नोकरी सोडून किशोर २०११ मध्ये भारतात आले आणि त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची समाजमाध्यमांवरून त्यांची प्रतिमा अधिक उजळ केली.