आम आदमी पक्षातून निलंबित केलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी दिल्ली सरकारच्या विरोधात सुरू केलेले आमरण उपोषण तासाभरातच मागे घेतले. जनलोकपाल मंजूर करण्यासह आपल्या इतर मागण्या दहा दिवसांत मंजूर झाल्या नाहीत तर दहा दिवसांत मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांना अभिप्रेत असलेले जनलोकपाल विधेयक निर्धारित वेळेत आणले नाही, तर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा बिन्नी यांनी दिला. पक्षशिस्तीचा भंग केल्यावरून बिन्नी यांना आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आले. जनतेच्या हिताच्या प्रश्नांशी आपण सरकारला पाठिंबा देऊ असे बिन्नी यांनी सांगितले. नायब राज्यपाल नजीब जंग आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सूचनेवरून उपोषण मागे घेत असल्याची घोषणा बिन्नी यांनी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हुकूमशाह असल्याचा आरोप केल्यानंतर पक्षाने बिन्नी यांच्यावर कारवाई केली. कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी राज्यपालांना भेटून केली. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचा पाठिंबा काढण्याची काँग्रेसला कोणतीही घाई नाही. मात्र राष्ट्रपतींच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणावर कायदामंत्री सोमनाथ भारती यांची टीका चुकीची असल्याचे प्रवक्ते मुकुल वासनिक यांनी स्पष्ट केले.