Explosives Found in J&K: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर व तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागा व छुपे तळ शोधून काढण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून काही ठिकाणी लष्कराची थेट दहशतवाद्यांशीही चकमक होत असल्याचं समोर आलं आहे. अशाच एका मोहिमेमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातल्या दहशतवाद्यांच्या एका तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात हा तळ उद्ध्वस्त झाला असून तिथून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

इंडियन एक्स्प्रेसनं प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर व विशेष कृती दलाने संयुक्तपणे जम्मू-काश्मीरमध्ये ही शोधमोहीम राबवली आहे. या शोधमोहिमेदरम्यान सुरनकोट परिसरातील जंगलात दहशतवाद्यांच्या तळ असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली. त्यानुसार, तातडीने या भागात सुरक्षा दल दाखल झालं. सूरनकोट परिसरात दहशतवाद्यांचा एक तळ सापडला असून तिथे चक्क जेवणाच्या डब्यात स्फोटकं लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांच्या तळावर काय सापडलं?

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तळावर स्फोटकं उडवण्यासाठीच्या यंत्रणेचे पाच सेट आणि दोन वायरलेस सिस्टीम आढळून आल्या. त्याशिवाय, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि इतर यंत्रसामग्रीही लष्करानं ताब्यात घेतली आहे. या तळावर सापडलेल्या पाच आयईडीमध्ये अर्धा किलो ते ५ किलोपर्यंत स्फोटकं सापडली. ही स्फोटकं त्याच ठिकाणी नष्ट करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या पाच आयईडींपैकी दोन आयईडी दोन स्टीलच्या बादल्यांमध्ये ठेवले होते, तर तीन आयईडी चक्क जेवणाच्या डब्यात ठेवल्याचं आढळून आलं. याशिवाय युरियाची पाच पाकिटं, एक पाच लिटरचा गॅस सिलेंडर, एक दुर्बिण, तीन लोकरी टोप्या, तीन ब्लँकेट, काही पँट असं साहित्यही इथे आढळून आलं.

दहशतवाद्यांचा शोथ सुरू

दरम्यान, सापडलेल्या साहित्यावरून या ठिकाणी तीन दहशतवाद्यांनी वास्तव्य केल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम हल्ल्याला दोन आठवडे उलटल्यानंतर सुरक्षा पथकांना हे साहित्य मिळाल्यामुळे याचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी अद्याप फरार असून पोलीस व लष्कराची पथकं या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.