चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी भारतात येऊन उभय देशांमधील सीमातंटा शांततेच्या मार्गाने कायमचा मिटवण्याची इच्छा प्रकट केली असली तरी प्रत्यक्षात चीनची कृती त्याविरूद्ध असल्याचेच स्पष्ट होत आहे. लडाखमधील देप्सांग भागात तब्बल २० दिवस मुक्काम ठोकणाऱ्या चिनी सैन्याने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच छेदणारा पाच किलोमीटरचा रस्ता बांधला असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान केकियांग भारताच्या दौऱ्यावर येण्यास दोन दिवस बाकी असतानाच चिनी लष्कराने हा रस्ता बांधला.
भारतीय हद्दीतील सिरी जाप या लष्करी ठाण्यापासून काही अंतरावर फिंगर-४ हे ठिकाण आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. या रेषेला छेदूनच हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या भागात गस्ती घालणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडय़ांनाही चिनी लष्कराने हटकले आहे. १९ मे रोजी हा प्रकार उघडकीस आला. या रस्त्याच्या बांधकामाबाबत मात्र चीनने कानावर हात ठेवले आहेत. तर भारतीय लष्कराने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. गस्ती पथकांना चिनी लष्कराने हटकल्यानंतर आता त्या ठिकाणची गस्ती अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय हद्दीतील फिंगर-८ या भागात आता भारतीय लष्कराला प्रवेश मिळू शकलेला नाही.
फिंगर -४ हे ठिकाण सिरी जाप भागाअंतर्गत येते. चीनच्या नकाशानुसार हा भाग चीनच्या अधिपत्याखाली येतो तर भारतीय लष्कराने हा भाग लडाख अंतर्गत असल्याचा दावा केला आहे. १९६२ चे युद्ध हे या भागात झाले होते. या भागात दिलेल्या लढतीसाठी मेजर धनसिंग थापा यांना परमवीर चक्र देण्यात आले होते. वाटाघाटींच्या पातळीवर भारत या भागावर दावा करीत असताना चिनी सैन्याने मात्र या भागात धातूचे वेष्टण असलेला रस्ता बांधला असून हा अक्साय चीनचा भाग असल्याचा दावा केला आहे. भारतीय सैन्यानेही गस्तीसाठी अनेकदा या रस्त्याचा वापर केला आहे व त्यावर दावाही सांगितला आहे.
फिंगर-४ विषयी..
* १९६२ चे युद्ध हे या भागात झाले होते
* या भागात दिलेल्या लढतीसाठी मेजर धनसिंग थापा यांना परमवीर चक्र देण्यात आले होते
* चीनच्या नकाशानुसार फिंगर -४ चीनच्या अधिपत्याखाली येतो
* हा भाग लडाख अंतर्गत असल्याचा भारतीय लष्कराचा दावा
* या भागात धातूचे वेष्टण असलेला रस्ता बांधून अक्साई चीनचा भाग असल्याचा चीनचा दावा
* भारतीय सैन्याकडूनही गस्तीसाठी अनेकदा या रस्त्याचा वापर
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2013 रोजी प्रकाशित
चीनची पुन्हा दादागिरी
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी भारतात येऊन उभय देशांमधील सीमातंटा शांततेच्या मार्गाने कायमचा मिटवण्याची इच्छा प्रकट केली असली तरी प्रत्यक्षात चीनची कृती त्याविरूद्ध असल्याचेच स्पष्ट होत आहे. लडाखमधील देप्सांग भागात तब्बल २० दिवस मुक्काम ठोकणाऱ्या चिनी सैन्याने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच छेदणारा पाच किलोमीटरचा रस्ता बांधला असल्याचे उघडकीस आले आहे.
First published on: 27-05-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Face offs continue china has built 5 km road crossing lac