Facebook Post Of Singapore Women: सिंगापूरमधील एका सॅलड शॉपच्या मालकीण जेन ली यांचे १९ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधीच त्यांनी दोन फेसबुक पोस्ट शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी एका भारतीय कर्मचाऱ्यावर भरपाई मागण्यासाठी दुखापतीचा खोटारडेपणा केल्याचा आरोप केला होता. चॅनल न्यूज एशियामधील वृत्तानुसार, ली यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सिंगापूर पोलीस दलाने त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची चौकशी सुरू केली आहे.

जेन ली या सिंगापूरमधील हॉलंड व्हिलेज येथील सुमो सॅलड या शॉपच्या मालकीण होत्या. शनिवार, १९ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक दिवस आधी, ली यांनी त्यांच्या शॉपकडून भरपाई मागण्यासाठी एका भारतीय कर्मचाऱ्याने दुखापतीचे नाटक केल्याचे आणि यामुळे त्यांना झालेल्या त्रासाची माहिती देण्यासाठी फेसबुकवर दोन पोस्ट केल्या होत्या.

१८ जुलै रोजी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये जेन ली म्हणाल्या की, “भारतातील एका महिलेने कामावर असताना दुखापत झाल्याचा खोटा दावा दाखल करण्यासाठी अपघात घडवून आणला. भरपाई मिळावी म्हणून तिने असे कृत्य केले. मी कधीच कल्पना केली नव्हती की कोणीतरी फक्त पैशासाठी अशा फसव्या कृती करू शकते.”

“भारतातील एक कामगार, किरणजीत कौर माझ्याकडे नोकरीसाठी होती. तिचा करार संपण्याच्या दोन दिवस आधी तिने एक घटना घडवली, ती कचरा टाकण्यासाठी एस्केलेटरवर जाताना ती मुद्दाम घसरली आणि पडली. त्या दिवशी तिने कामावरून लवकर निघणे अपेक्षित होते, पण ती जाणूनबुजून तिथेच थांबली. त्यानंतर हे स्पष्ट झाले की, हा अपघात पूर्वनियोजित होता. कदाचित कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्याचा खोटा दावा दाखल करण्याचा प्रयत्न”, असे ली यांनी फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

या मृत महिलेने दावा केला होता की, किरणजीत कौर आणि तिचा पती मामू यांनी यापूर्वीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने याला “काळजीपूर्वक आखलेली योजना… संभाव्यतः कायदेशीर फर्मच्या मदतीने, जी कामगारांना नुकसानभरपाईसाठी दुखापतीच्या दाव्यांचा फायदा कसा घ्यावा याचे प्रशिक्षण देते,” असे म्हटले.

सॅलड शॉपच्या मालकीण ली यांनी पुढे दावा केला की, कौर खरोखर जखमी झाली नव्हती आणि तिने भरपाईसाठी खोटा अपघात घडवून आणला. ली यांनी पुढे सांगितले की, हा आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या कडे व्हिडिओ फुटेज आहे.

Live Updates