ट्विटरवरून थट्टामस्करी करणारे संदेश जगातील बहुतांश देशात लोकप्रिय असलेले फेसबुक हे संकेतस्थळ गुरुवारी काही काळ बंद पडले होते व त्यावर अनेक प्रतिक्रिया ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावरून उमटल्याची कबुली फेसबुकने दिली आहे.
गुरुवारी उशिरा ही समस्या उद्भवली होती व आमच्या एका आज्ञावलीतील काही बाबी अद्ययावत केल्या जात असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले.
आम्ही काही बदल केल्यानंतर लोकांना फेसबुक सेवेत अडचणी येऊ लागल्या त्यामुळे हे लक्षात येताच आम्ही ती समस्या ३० मिनिटांत दूर केली. त्यानंतर प्रत्येकाला फेसबुकची सेवा १०० टक्के पूर्ववत मिळाली आहे, असे या प्रवक्त्याने इमेलमध्ये म्हटले आहे. असे नेहमी घडत नाही, पण आम्ही अनुभवातून शिकत फेसबुक आणखी विश्वासार्ह करू, असेही प्रवक्ता म्हणाला.
जेव्हा लोकांनी गुरुवारी फेसबुक उघडले तेव्हा समथिंग वेंट राँग (काहीतरी चुकीचे घडते आहे.) असा संदेश त्यांच्या संगणकावर व स्मार्टफोनवर आला. त्यामुळे सगळे फेसबुक वापरकर्ते ट्विटरवर गेले व त्यांनी तेथे या सेवाखंडाबद्दल विनोद केले व नाराजीही व्यक्त केली. फेसबुकडाऊन या हॅशटॅगअंतर्गत यावर बरीच चर्चा झाली.
एकमेकांपुढे येऊन संवाद करण्यात एक मिनिटाची स्तब्धता असे हर्बर्ट याने लिहिले. फेसबुकची थट्टा करणारे संदेश त्यात होते.
मार्क लिटल यांनी म्हटले, की लाखो लोक मोठी आपत्ती कोसळल्यासारखे व धक्का बसल्यासारखे मित्र व कुटुंबीयांना फेसबुकवर शोधत भटकत आहेत. काहींनी असे म्हटले, की आता अपडेट करता येणार नाहीत तर जग चालणार कसे, विमानतळाच्या लाउंजमध्ये बसून ब्रेकफास्ट करतोय, असे संदेश, पाळीव प्राण्यांची छायाचित्रे टाकणार कशी अशी थोडीशी टपली उडवणारी टिप्पणी केली. हे घडले तेव्हा अमेरिकेतील लोक झोपलेले होते. रशिया, स्पेन, इंग्लंड येथेही त्याचा परिणाम झाला. फेसबुकचे महिन्याला १.२ अब्ज वापरकर्ते आहेत.