Extra Marital Affairs Exposed due to Failed Online Payment : एका चिनी व्यक्तीचं ऑनलाइन पेमेंट अयशस्वी झालं अन् त्यातून त्याचे विवाहबाह्य संबंध पत्नीसमोर उघड झाल्याची घटना समोर आली आहे. या इसमाने ग्वांगडोंग प्रांतातील यांगजियांग येथील एका फार्मसीमधून मोबाइल पेमेंट कोडद्वारे १५.८ युआन (जवळपास २०० रुपये) किमतीच्या गर्भनिरोधक गोळ्या खरेदी केल्या होत्या. परंतु, सिस्टिम एररमुळे त्याचं पेमेंट अयशस्वी झालं आणि अनावधानाने त्याचे विवाहबाह्य संबंध उघड झाले.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार फार्मसी कर्मचाऱ्यांनी पैसे वसूल करण्यासाठी या व्यक्तीच्या मेंबरशिप कार्डशी लिंक्ड फोन नंबरवर कॉल केला. गर्भनिरोधक गोळ्यांसाठी केलेलं पेमेंट अयशस्वी झाल्याचं त्यांनी फोनवरून सांगितलं आणि त्यातून या व्यक्तीचं बिंग फुटलं.
इसमाचा फार्मसी कंपनीवर आरोप
या व्यक्तीने म्हटलं आहे की फार्मसी कंपनीने एकाच वेळी दोन कुटुंबं उद्ध्वस्त केली आहेत. त्याने फार्मसी कंपनीविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत हेनान झेजिन लॉ फर्मचे संचालक फू जियान यांनी एलिफंट न्यूजला सांगितलं की तो “इसम कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु, ते कठीण आहे.”
फार्मसी कंपनीविरोधात कारवाई होऊ शकते का?
फू म्हणाले, “त्या इसमाच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्याच्या पत्नीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचं कुटुंब विभक्त होण्यास सर्वस्वी तोच जबाबदार आहे. परंतु, त्यासाठी त्याने फार्मसी कंपनीला जबाबदार धरणं चुकीचं आहे. फार्मसी कंपनीने त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन केलं असेल तर त्याने कंपनीला कायदेशीररित्या जबाबदार धरावं. त्याने न्यायालयात याविरोधात दाद मागून पाहावी.”
“मात्र, त्या इमसाला न्यायालयात सिद्ध करावं लागेल की फार्मसी कंपनीमुळेच त्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. फार्मसी कंपनीला केवळ त्यांचे पैसे हवे होते. त्यांनी सदर इसमाच्या घरी त्याचं बिंग फोडण्यासाठी कॉल केला नव्हता. तरीदेखील त्या इसमाची फार्मसी कंपनीविरोधात तक्रार असेल तर त्याला न्यायालायत फार्मसी कंपनीचा फोन व त्याचा संसार मोडणं या दोन गोष्टींचा संबंध सिद्ध करणारे पुरावे सादर करावे लागतील. तसेच कंपनीने त्याच्या कुठल्याही हक्काचं उल्लंघन केलं आहे का हे देखील सिद्ध करावं लागेल.”
यापूर्वी एका चिनी महिलेने तिच्या भाड्याच्या घरात एक छुपा कॅमेरा बसवला होता. जिथे तिचा नवरा त्याच्या प्रेयसीबरोबर राहत होता. त्यानंतर सदर महिलेने तिच्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघड करणारे व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करून खळबळ उडवली होती.