हमासने तीन ओलीस महिलांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये महिलांनी इस्रायलच्या राजकारणावर टीका केली आहे. तसंच,सरकारने आम्हाला सोडायला हवं होतं, असंही म्हटलं आहे. सात ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायले हल्ला केल्यानंतर या महिलांना ओलीस ठेवले होते. तेव्हापासून ते हमासच्या ताब्यात आहेत. या व्हिडीओला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी क्रूर मनोवैज्ञानिक प्रचार असं संबोधलं आहे.
हमासने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये तीन महिला आहेत. ट्रुपानोब, डॅनिएल अलोनी आणि रिमोन किर्ष्ट असं या तीन महिलांची नावं आहेत. एका बंद खोलीत खुर्चीवर त्या बसलेल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी अलोनी यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर राग व्यक्त केला असून एक संदेशही दिला आहे. हमासच्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि त्यांना मायदेशी आणण्यात नेतान्याहू अयशस्वी ठरल्याचा आरोप करून त्यांनी पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात ओलिसांची सुटका करण्यासाठी कराराची मागणी या व्हिडीओतून केली.
हेही वाचा >> “…याचा अर्थ हमासने ‘त्या’ तरुणीचं मुंडकं छाटलं”, इस्रायली राष्ट्रपतींचा दावा
“तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करायला हवे होते. तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहात. पण त्याऐवजी आम्ही तुमचे राजकीय, सुरक्षा, लष्करी आणि राजनैतिक अपयश सहन करत आहोत”, असं अलोनी या व्हिडीओमध्ये संतापाच्या भरात बोलल्या आहेत.
हा व्हिडीओ समोर येताच बेंजामिन नेतान्याहू एका निवेदनात म्हणाले की, “ओलिसांना लवकरच मायदेशी आणणार आहोत. हमासने अपहरण केलेल्यांप्रती आमच्या संवेदना आहेत. आम्ही सर्व बंदिवान आणि बेपत्ता लोकांना घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”
अलोनीचे वडील रामोस अलोनी यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला व्हिडिओमध्ये पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला होता. परंतु, त्यांची मुलगी जीवंत आहे हे पाहून बरंही वाटलं.
७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात अलोनी बेपत्ता होती. आतापर्यंत तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती. अलोनी तीन वर्षांच्या जुळ्या नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील इतर पाच जणांसह कैदेत आहे, अशी माहिती तिच्या वडिलांनी तेल अवीवमधअये पत्रकारांना दिली.
८३०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू
इस्रायली फौजा आणि रणगाड्यांनी गाझापट्टीत सोमवारी आगेकूच केली. उत्तर गाझाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी जोरदार हल्ले करण्यात आले. त्याच्या जोडीला हवाई हल्लेदेखील सुरू आहेत. हे हवाई हल्ले हजारो पॅलेस्टिनी लोकांनी आश्रय घेतलेल्या आणि हजारो जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांजवळ झाले असल्याचा धोक्याचा इशारा संयुक्त राष्ट्रे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिला.
आतापर्यंत या युद्धामध्ये ८,३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या एका चित्रफितीमध्ये मध्य गाझामध्ये इस्रायली रणगाडे आणि बुलडोझर यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्याचे दिसले. हा मार्ग असाच बंद झाला तर उत्तर गाझामध्ये अडकलेल्या पॅलेस्टिनींना आपली सुटका करून घेता येणे शक्य होणार नाही, कारण दक्षिणेकडे जाण्यासाठी हा एकमेव वापरण्याजोगा मार्ग उरला आहे.