पाकिस्तान आणि बांगलादेशात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनी दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा तयार केल्या आहेत. दोन्ही देशातील सीमांवरून या नोटा भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर सीमावर्ती भागातून दीड महिन्यात आतापर्यंत चार कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना नोटा ओळखण्यात अडचण येत असल्याचे समजताच लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) बनावट नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना बनवण्यात येत आहे.
गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीची विस्तृत माहिती अर्थ मंत्रालयाला पाठवली होती. केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांच्याबरोबर रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. लवकरच रिझर्व्ह बँक विशेष टीम गठीत करून हे प्रशिक्षण अभियान राबवणार आहे. लष्कर आणि बीएसएफच्या प्रशिक्षण केंद्रांबरोबर रिझर्व्ह बँकेची विशेष टीम समन्वय करून प्रशिक्षणाची रूपरेषा आणि जागा निश्चित करेल. बांगलादेश आणि पाकिस्तान सीमेवर पकडण्यात आलेल्या दहशतवादी आणि तस्करांकडून अनेकवेळा मोठ्याप्रमाणात दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. १५ डिसेंबरनंतर या नोटा जप्त करण्यात तेजी आली.

गुप्तचर संस्थांनी सरकारला संशयित सीमावर्ती भागांबाबात माहिती पाठवली आहे. ज्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नोटांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आलेल्या निम्म्याहून अधिक वैशिष्ट्यांची नक्कल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पकडण्यात आलेल्या बनावट नोटांमध्येही खऱ्या नोटांमध्ये असलेले जिओमॅट्रिक पॅटर्न आढळून आले आहेत. रंगसंगती, वॉटर मार्किंग आणि विशेष नंबर पॅटर्न खऱ्या नोटेप्रमाणेच आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारच्या नव्या नोटेत १७ सुरक्षा वैशिष्ट्ये टाकली आहेत. बनावट नोटांत यातील बहुतांश वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे जवानांना या नोटा ओळखणे कठीण जात आहे.
नुकताच बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवर एका युवककाडून बीएसएफने दोन हजारांच्या चार लाख नोटा जप्त केल्या होत्या. या नोटा तपासासाठी रिझर्व्ह बँकेच्या कोलकाता येथील क्षेत्रिय कार्यालयात पाठवण्यात आले होते. त्यावेळी बनावट नोटा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांची नक्कल केल्याची माहिती उजेडात आली होती.
जैसरलमरच्या सीमेवर सव्वा कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आले होते. आतापर्यंत ४२ तस्कर आणि दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ कोटी ९६ लाख ७२ हजार पाचशे रूपयांचे दोन हजार पाचशे रूपयांच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आले होते.