Fake Doctor : आसाममध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ५० सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या बनावट डॉक्टरचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून शस्त्रक्रिया करतानाच पोलिसांनी बनावट डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. या डॉक्टरला अटक करण्यात आल्यानंतर प्राथमिक तपासातून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. कोणत्याही वैद्यकीय पात्रतेशिवाय ५० पेक्षा जास्त सिझेरियन शस्त्रक्रिया या डॉक्टरने केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या डॉक्टरला आता अटक केलं असून हा डॉक्टर गेल्या एका दशकाहून अधिक काळ तो डॉक्टर असल्याचं भासवत होता. हा डॉक्टर आसामच्या सिलचरमधील दोन खासगी रुग्णालयात काम करत होता. एवढंच नाही तर त्याला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सर्वत्र ओळखलं जात होतं. मात्र, पोलिसांनी या बनावट डॉक्टरचा आता पर्दाफाश केला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.
वृत्तानुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करत पोलिसांनी या डॉक्टरला अटक केलं आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी रुग्णालयात छापा टाकला. दरम्यान पोलिसांनी जेव्हा छापा टाकाला तेव्हा तो डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये सि-सेक्शनची शस्त्रक्रिया करत होता.
पोलिसांनी काय म्हटलं?
या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, “आम्हाला या डॉक्टरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आम्ही प्राथमिक काही कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की, या डॉक्टरचे सर्व प्रमाणपत्र बनावट आहेत. तो अनेक वर्षांपासून बनावट वैद्यकीय व्यवसाय करत होता.”
दरम्यान, आसाममधील श्रीभूमी येथील हा डॉक्टर रहिवाशी असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या डॉक्टरला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे बनावट डॉक्टरांविरुद्धच्या मोठ्या कारवाईचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे.