India Pakistan War Tensions : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भारताने तेवढ्यावरच न राहता पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरही थेट हल्ला केला आहे. ७ मे च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. तर याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतावर हल्ला केला आहे. दरम्यान, काही पाकिस्तान समर्थकांकडून चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले जात असून यातून पाकिस्तानच्या हवाई दलाकडून श्रीनगर एअरबेसवर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, हे दावे खोटे असून व्हिडिओही फेक असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडूनही कुरापती करण्यात आल्या. मात्र, काही जुने व्हिडिओ शेअर करून भारतातील श्रीनगर येथे हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून श्रीनगर एअरबेस लक्ष्य करण्यात आल्याचा दावा या व्हिडिओंमधून केला जातोय. मात्र, हे व्हिडिओ श्रीनगरचे नसल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ भारतातलेही नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
व्हायरल होत असलेले व्हिडिओ कुठले?
पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलंय की, २०२४ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पंख्तुनख्वा येथील अंतर्गत संघर्षादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे अधिकृत माहितीकरता भारत सरकारच्या अधिकृत स्त्रोतांवरच अवलंबून राहा.
बातमी अपडेट होत आहे