family paid 40-50 lakh to agent Haryana youth killed in Guatemala on dunki route to US : गेल्या वर्षी अमेरिकेत जाण्याचे स्वप्न घेऊन घरातून बाहेर पडलेल्या हरियाणातील एका १८ वर्षीय तरुणाची ग्वाटेमाला येथे हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीर डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी त्याने घर सोडले होते, मात्र त्याच्या आधीच त्याला जीव गमवावा लागला आहे. मानवी तस्करांनी त्याला ओलीस ठेवल्यानंतर त्याची कथितपणे हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी शनिवारी केला आहे.
मृत तरूणाचे नाव युवराज असे असून तो हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील एका गावातील शेतकर्याचा मुलगा होता. तो गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत काम शोधण्यासाठी गेला होता, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
“युवराजने १२ वी पास केली होती आणि त्याला त्याच्या कुटुंबाला मदत करायची होती. तो नेटवर्कच्या माध्यमातून (network of contacts) सुरक्षितपणे अमेरिकेत पोहोचेल असे आम्हाला सांगण्यात आले होते,” असे युवराजचे मामा गुरपेज सिंग यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले.
मानवी तस्करांपैकीच एकाने नुकतेच त्यांना युवराजचे आणि पंजाबच्या आणखी एका तरुणाचे मृत्यूचे प्रमाणपत्र आणि फोटो पाठवले, तेव्हा त्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती मिळाली, असे युवराजच्या कुटुंबीयांनी सांगितले.
पैसे दिले अन् संपर्क तुटला
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणामधील तीन ट्राव्हल एजंट्सनी मुलाच्या सुखरूप प्रवासासाठी कुटुंबाकडून मोठी रक्कम घेतली होती. पण पहिले पेमेंट झाल्यानंतर युवराजबरोबरचा संपर्क तुटला असे गुरपेज सिंग यांनी सांगितले.
एक महिन्यानंतर कुटुंबाला युवराज आणि दुसर्या एका तरुणाला ग्वाटेमाला येथे ओलीस ठेवण्यात आल्याचे व्हिडीओ पाठवण्यात आले. त्यानंतर तस्करांकडून खंडणीची मागणी करण्यात आली.
“नुकतेच तस्करांपैकी एकाने युवराज याची हत्या झाल्याचा दावा करत संपर्क साधला आणि पुरावा देण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली. पेमेंट झाल्यानंतर त्याने मृत्यू प्रमाणपत्र आणि फोटो पाठवले,” असे मृताच्या काकांनी सांगितले.
त्यांनी असेही सांगितले की, कुटुंबाला वाटते की स्थानिक एजंटच्या मार्फत पाठवण्यात आलेले पैसे परदेशातील तस्करांपर्यंत पोहचले नसावेत
गुरपेज सिंग यांनी माहिती दिली की, “युवराजच्या कुटुंबाने ट्रॅव्हल एजंट्सना आणि मानवी तस्करी करणाऱ्यांना एकूण ४० लाख ते ५० लाख रुपये इतकी रक्कम दिली.” कुटुंबाने यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर दोन स्थानिक एजंट्सना अटक करण्यात आली होती असेही त्यांनी सांगितले. मात्र यानंतर नंतर त्यांना युवराजच्या मृत्यूची माहिती देण्यात आली, असेही ते म्हणाले.
हरयाणा, पंजाब आणि इतर राज्यांतील अनेक लोक ‘डंकी मार्गांचा’ (dunki routes) वापर करून अमेरिकेत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हे मार्ग किती धोकादायक असू शकतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही मानवी तस्करी करणाऱ्याकडून या मार्गांचा वापर केला जातो.
अशा वाटेने अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक स्थलांतरितांना अतिशय खराब वागणूक सहन करावी लागली आहे, तसेच शेकडो लोकांना अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यानंतर हद्दपार करण्यात आले आहे.
