आजकाल एसी घरात असणं ही बाब अत्यंत सामान्य आहे. अनेकांकडे एसी लावल्याचं पाहण्यास मिळतं. दरम्यान इमारतीत एसीचा स्फोट झाल्याने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत या कुटुंबातला मुलगा बचावला आहे. त्याने स्फोट होताच उडी मारली त्यामुळे तो वाचला. शिवाय या मजल्यावर राहणाऱ्या इतर घरांमध्येही सुदैवाने दुर्घटना घडली नाही. ही घटना हरियाणातल्या फरीदाबाद येथील आहे.
नेमकं काय घडलं?
सचिन कपूर, त्यांची पत्नी रिंकू आणि मुलगी सुजैन कपूर यांचा एसीच्या स्फोटाच्या धुरामुळे मृत्यू झाला. शिवाय त्यांचा पाळीव कुत्राही याच घटनेत मरण पावला. कपूर कुटुंबाचं घर दुसऱ्या मजल्यावर आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात एसीचा स्फोट झाल्याची घटना रविवारी उशिरा घडली. पहिल्या मजल्यावर स्फोट झाल्याने धुराचे लोट पसरले पण या ठिकाणी कुणीही रहात नसल्याने अनर्थ टळला. हा धूर दुसऱ्या मजल्यावरही गेला. हा धूर नाका तोंडात गेल्याने गुदमरुन कपूर दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
थोडक्यात बचावला कपूर यांचा मुलगा
सचिन कपूर यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता. स्फोटाचा आवाज ऐकून त्याने तातडीने उडी मारली. त्यामुळे तो बचावला आहे. मात्र या घटनेत त्याचे आई वडील आणि बहीण यांचा मृत्यू झाला. स्फोटाचा जोरदार आवाज झाल्याने आम्ही उठून बसलो, शेजारी स्फोट झाल्याचं आम्हाला समजलं. आम्ही तातडीने तो मजला रिकामा केला आणि लोकांना मदत केली असं मयांक नावाच्या कपूर यांच्या शेजाऱ्याने सांगितलं.
मयांक नावाच्या शेजाऱ्याने काय सांगितलं?
एसीचा स्फोट झाल्याने पहिल्या मजल्यावर आग लागली होती. त्यावेळी सगळेजण दुसऱ्या मजल्यावर धावले. पहिल्या मजल्यावर जी आग लागली त्या धुराचे लोट दुसऱ्या मजल्यावर पोहचले. धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर कपूर यांच्या घरात शिरले. त्यामुळे कपूर दाम्पत्य, त्यांची मुलगी आणि पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता त्याने तातडीने उडी मारली आणि तो खाली पडला. त्याला थोडं लागलं आहे पण त्याचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. चार मजली इमारतीत हा स्फोट झाला.