पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर गळून जातो व उत्पादनावर वाईट परिणाम होतो, पण मध्य प्रदेशातील नूरजहाँ या आंब्याच्या खास प्रजातीचे तसे नाही. या आंब्याचे वजन यावेळी गारपीट व पावसाने ४०० ग्रॅमने वाढण्याची शक्यता आहे. आंब्याची ही प्रजात अलिराजपूर जिल्ह्य़ात आढळते व ती दुर्मीळ मानली जाते. एकप्रकारे या आंब्याची पावसाने नासाडी होण्याऐवजी तो ‘हेवीवेट’ होणार आहे. या प्रजातीला आंब्यांची महाराणी असे म्हणतात. ही प्रजात मूळ अफगाणिस्तानातील असून ती भारतात अलिराजपूर जिल्ह्य़ात कठ्ठीवाडा येथे आढळते, असे आमराईचे मालक शिवराज सिंह लोधी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आंबा पिकाच्या इतरही प्रजाती असून पावसाने त्यांचे ४० टक्के नुकसान झाले आहे. नूरजहाँ या प्रजातीने मात्र स्वत:चा पाऊस व गारपिटीपासून बचाव केला आहे.
नूरजहाँ आंब्याचे वजन सरासरी ३.८ किलो असते ते या वर्षी ४.२ किलोपर्यंत जाईल असे सांगून ते म्हणाले की, आंब्याला डिसेंबरमध्ये मोहोर येतो व जूनमध्ये फळे तयार होतात.  
हे फळ एक फूट लांब असते व त्याची कोय २०० ग्रॅमची असते. तज्ज्ञांच्या मते वातावरणातील बदल व काळजी न घेतल्यास काठीवाडा भागात या आंब्याच्या झाडांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआंबाMango
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer claims noor jahan will weigh 400 gramsthis year
First published on: 14-04-2015 at 12:04 IST