काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत बोलताना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत, सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच, “ …अखेर पंतप्रधान किती वेळा माफी मागणार? ” असा सवाल देखील उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सत्याग्रही शहीद शेतकर्‍यांच्या नावे नुकसान भरपाई न देणे, नोकऱ्या न देणे, अन्नदात्यांवरील पोलीस खटले मागे न घेणे या मोठ्या चुका ठरतील. शेवटी पंतप्रधान किती वेळा माफी मागणार?” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

याचबरोबर, संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना नोकऱ्या आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी माझी इच्छा आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात जवळपास ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांच्याकडून चूक झाली. ३० नोव्हेंबर रोजी कृषि मंत्र्यांना विचारण्यात आलं होतं की, आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, माझ्याकडे याबाबत काही आकडेवारी नाही.”

याचबरोबर राहुल गांधी यांनी हे देखील म्हटले की, “जर सरकारकडे काही माहिती नाही तर आमच्याकडून यादी घ्यावी. मी संसदेत आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी ठेवत आहे. पंजाब सरकारने ४०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. याशिवाय १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देखील देण्यात आली आहे. माझ्याकडे पूर्ण यादी आहे. याशिवाय आम्ही हरियाणाच्याही ७० शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. आणि तुमचे सरकार म्हणते की मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest how many times will the prime minister apologize rahul gandhis question in parliament msr
First published on: 07-12-2021 at 13:01 IST