मध्य प्रदेशातील मंदसौर येथील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज, ओदिशात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या वाहनांवर अंडी फेकली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवून या घटनेचा निषेध नोंदवला.

केंद्रीय मंत्री सिंह हे अतिथीगृहाकडून जतानी येथे ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आंदोलन केले. सिंह यांच्या वाहनांच्या ताफ्याला त्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच काही कार्यकर्त्यांची त्यांच्या वाहनावर अंडी फेकली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष लोकनाथ महारथी यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सत्यब्रता भोई यांनी दिली. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असून, राज्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले जात आहे. त्यामुळे राधामोहन सिंग यांना कृषिमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका युवक काँग्रेसच्या महारथींनी केली आहे.