नवी दिल्ली : हरियाणातील पोलिसांच्या हिंसक कारवाईनंतर शेतकरी संघटनांनी उत्तर प्रदेशात भाजपविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘किसान महापंचायत’ आयोजित केल्या जातील, अशी माहिती ‘संयुक्त किसान मोर्चा’चे नेते अभिमन्यू कोहार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भारतीय किसान युनियन टिकैत गटाचा गड मानल्या गेलेल्या मुझफ्फरनगरमध्ये रविवारी ५ सप्टेंबर रोजी किसान महापंचायत होणार असून किमान २५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा कोहार यांनी केला.

‘संयुक्त किसान मोर्चा’ने नोव्हेंबपर्यंत आंदोलनाची दिशा निश्चित केली असून त्यानुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांतील गावागावांत आंदोलन केले जाणार आहे. ‘उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे आंदोलन दहा पटीने तीव्र होईल. राज्यातील १८ महसूल विभागात महापंचायत होईल. त्यानंतर ७५ जिल्ह्य़ांमध्ये महापंचायती होईल मग, विधानसभा मतदारसंघनिहाय महापंचायती आयोजित केल्या जातील’, अशी माहिती कोहार यांनी दिली.

आंदोलनाशी जोडलेल्या शेतकरी नेत्याच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू वगैरे विधानसभा निवडणुकीतही मोर्चाच्या नेत्यांनी भाजपच्या शेतीधोरणाविरोधात सभा घेतल्या होत्या पण, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे, राज्यभर भाजपविरोधात आंदोलन करून सत्ताधारी पक्षाच्या जागा कमी झाल्या तरच मोर्चालाही यश मिळेल हे लक्षात घेऊन शेतकरी संघटनांनी उत्तर प्रदेशमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आंदोलनामुळे कोणत्या राजकीय पक्षाला नुकसान वा फायदा होईल याच्याशी संयुक्त किसान मोर्चाचा संबंध नाही. आम्ही कोणा एका पक्षाला मते देण्याचे आवाहन करणार नाही, असे कोहार म्हणाले.

बळ जोखण्यासाठी लाठीमार?

हरियाणात करनालमध्ये शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक लाठीमार केला गेला असून आंदोलन किती कमकुवत होऊ शकेल याची चाचपणी केली गेली. शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले तर सिंघू आणि टिकरी येथील आंदोलनही मोडून काढता येईल या उद्देशाने हरियाणातील भाजप सरकारने पोलिसांना कारवाई करण्याचा आदेश दिला होता, असा दावा आंदोलनाशी संबंधित एका नेत्याने केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers unions in uttar pradesh form a front against bjp zws
First published on: 01-09-2021 at 02:03 IST