Tanu Rajput Murder: दृश्यम सिनेमातला विजय साळगावकर आठवतोय? त्याने एक हत्या लपवण्यासाठी जी काही शक्कल लढवली ती जवळपास देशातल्या प्रत्येकाला माहीत आहे. याच चित्रपटाशी साधर्म्य साधेल अशी घटना फरिदाबाद या ठिकाणी घडली आहे. सासऱ्याने त्याच्या सुनेची हत्या दृश्यम स्टाईलनेच केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरासमोर असलेल्या खड्ड्यात पुरला आणि वरुन बांधकाम होतंच त्याचा गैरफायदा घेऊन त्याने हा गुन्हा केला. तनु सिंगच्या हत्येचं गूढ पोलिसांनी आता उकललं आहे.
कशी झाली तनु राजपूतची हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनु राजपूतची हत्या तिचा सासरा भूप सिंग यानेच केली. भूप सिंगच घर रोशन नगर या ठिकाणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ एप्रिलच्या रात्री भूप सिंहने त्याची पत्नी सोनिया आणि मुलगा अरुण घरी नसताना तनुचा पहिल्या मजल्यावर गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह एका खड्ड्यात टाकला. हा खड्डा पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदण्यात आला होता. तनूची हत्या ‘दृश्यम’ चित्रपट पाहून केली आहे, असा तिच्या माहेरच्यांचा दावा आहे.
तनुच्या सासरच्या लोकांनी काय सांगितलं?
तनूच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी तनुच्या सासरच्या लोकांनी त्यांना सांगितले होते की तनू घरातून पळून गेली आहे. त्यानंतर तनूचे वडील हकीम सिंह तिच्या सासरच्या घरी गेले, त्यावेळी तनुचा नवरा आणि अन्य घरातील मंडळींनी त्यांच्या मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती, असे त्यांना समजले.
भूप सिंहने दिली सुनेच्या हत्येची कबुली
पोलिसांनी कोणतीही मदत केली नसल्याचा तनुच्या कुटुंबीयांचा आरोप होता. पण, पोलीस उपायुक्त उषा कंडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक आठवड्यापूर्वी औपचारिक तक्रार मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासाच्या दरम्यान पोलिसांना सासरच्या लोकांवर संशय आला, त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. तनूचे सासरे भूप सिंह शौचालय बांधण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी घराबाहेर खड्डा खोदला होता. पोलिसांनी तो खड्डा पुन्हा खोदला असता त्यात महिलेचा मृतदेह सापडला. त्याानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत भूप सिंहने सुनेच्या हत्येची कबुली दिली.
तनुच्या बहिणीचा आरोप काय?
तनुची बहीण प्रीतीने आरोप केला आहे की २०२३ साली लग्न झाल्यापासून तिच्या बहिणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. प्रीतीने आरोप केला की अरूण आणि त्याचे कुटुंबिय लग्न पार पडल्यापासून सोन्याच्या दागिन्यांची आणि पैशांची मागणी करत होते. तिने सांगितले की तनुच्या कुटुंबियांनी त्यांच्या मागण्या शक्य तेवढ्या प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याच्यावर सतत दबाव टाकण्यात आला.