FBI Raids Donald Trump’s Former Aide John Bolton: भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. याचबरोबर भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार रखडल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावरून अमेरिकेतून अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी भूमिकेवर टीका केली आहे. यामध्ये ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचाही समावेश आहे. आता याच जॉन बोल्टन यांच्या घरावर अमेरिकेची सर्वोच्च सुरक्षा यंत्रणा एफबीआयने छापा टाकला आहे. याबाबत एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर जॉन बोल्टन यांनी टीका केल्यानंतर काही दिवसांनीच त्यांच्या घरावर एफबीआयने छापा टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या शुक्रवारी अलास्कातील अँकोरेज येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर परिषदेच्या एक दिवस आधी त्यांनी टॅरिफ धोरणावर टीका केली होती.

यापूर्वी, हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, बोल्टन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना “अविवेकी राष्ट्राध्यक्ष” आणि भारत-अमेरिका संबंध “खूप वाईट स्थितीत” असल्याचे म्हटले होते.

त्यांनी अमेरिकेच्या भारताबद्दलच्या “गोंधळलेल्या” दृष्टिकोनावर टीका केली आणि रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड म्हणून २५ टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत असूनही चीनला ट्रम्प यांनी सूट दिल्याचे बोल्टन यांनी म्हटले होते.

१७ महिने डोनाल्ड ट्रम्प यांचे तिसरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करणारे जॉन बोल्टन यांचे इराण, अफगाणिस्तान आणि उत्तर कोरिया यासारख्या मुद्द्यांवर तत्कालीन राष्ट्राध्यक्षांशी वारंवार वाद होत होते, असे एपीने वृत्त दिले आहे.

ट्रम्प प्रशासनाने बोल्टन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रोखण्याचा प्रयत्न करत, त्यात गोपनीय माहिती असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर, ट्रम्प यांनी ४० हून अधिक माजी गुप्तचर अधिकाऱ्यांची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. या यादीत बोल्टन यांचे नाव देखील आहे.