Felix Baumgartner death जगप्रसिद्ध अॅडव्हेंचर स्पोर्ट्स अॅथलीट फेलिक्स बाउमगार्टनर यांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वयाच्या ५६व्या वर्षी इटलीमध्ये पॅराग्लायडिंग करताना त्यांचा मृत्यू झाला. २०१२ साली त्यांनी अंतराळातून पृथ्वीवर झेप घेऊन जगभरात ओळख मिळवली होती. आजही जगातील सर्वात उंच मानवी बलून फ्लाइट आणि पॅराशूट जंप म्हणून याची नोंद केली गेली आहे. त्यांच्या अपघाताविषयीची माहिती देणाऱ्या इटालियन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोर्तो सँट एल्पिडिओ शहरातील एका स्विमिंग पूलच्या बाजूला एक पॅराग्लायडर कोसळला. शहराच्या महापौरांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांची ओळख फेलिक्स बॉमगार्टनर असल्याची माहिती दिली.
फेलिक्स बाउमगार्टनर कोण होते?
“जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेले, धाडसाचे प्रतीक असलेले फेलिक्स बॉमगार्टनर यांच्या दुःखद निधनाने मोठा धक्का बसला आहे,” असे महापौर मॅसिमिलियानो सियारपेला म्हणाले. ‘फिअरलेस फेलिक्स’ म्हणून ओळखल्या जाणारे बॉमगार्टनर २०१२ साली चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या धाडसाने जगाला चकित केले होते. त्यांनी प्रेशराइज्ड सूट घालून न्यू मेक्सिकोवर एका महाकाय हेलियम फुग्यावरून पृथ्वीपासून २४ मैल (३९ किलोमीटर) पेक्षा जास्त उंचीवरून उडी मारली होती.
रेड बुल स्ट्रॅटोस प्रोजेक्टचा अंतर्गत त्यांनी हा पराक्रम केला होता. खाली उतरताना त्यांचा वेग ८४३.६ मैल प्रतितास होता. याचाच अर्थ त्यांनी ध्वनीच्या १.२५ पट वेगाने उड्डाण केले. त्यावेळी ते धोकादायक अशा फ्लॅट स्पिनमध्येदेखील अडकले होते, यादरम्यान ते १३ सेकंदांसाठी फिरत होते, अशी माहिती त्यांच्या पथकाने दिली होती. त्यावेळी फेलिक्स बॉमगार्टनर म्हणाले होते, “जेव्हा मी जगाच्या शिखरावर उभा होतो, तेव्हा मी विक्रम मोडण्याचा विचारच केला नाही, मी वैज्ञानिक डेटा मिळवण्याचाही विचार केला नाही. माझ्या मनात केवळ जिवंत परत जाण्याचा विचार होता,” असे त्यांनी पूर्व न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात उतरल्यानंतर म्हटले होते.
त्यांनी ज्या उंचीवरून उडी मारली ती स्कायडायव्हरसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त उंची होती, त्यांनी या पराक्रमामुळे जो किटिंगर यांचा मागील विक्रम मोडला. २०१२ मध्ये, जेव्हा बॉमगार्टनर यांनी कॅप्सूलमधून बाहेर पडल्यावर थंब्स-अप दाखवला आणि नंतर जमिनीजवळ येताच त्याने पॅराशूट सक्रिय केले आणि उतरल्यानंतर आपले हात वर केले. हे यूट्यूबचे लाईव्हस्ट्रीम त्यावेळी लाखो लोकांनी पाहिले.
ऑस्ट्रियन लष्कराचे माजी पॅराशूटिस्ट असलेल्या बॉमगार्टनर यांनी विमाने, पूल, गगनचुंबी इमारती आणि ब्राझीलमधील ‘ख्रिस्त द रिडीमर’ पुतळ्यासह प्रसिद्ध ठिकाणांवरून उड्या मारल्या आहेत. अलीकडेच त्यांनी युरोपमधील शोमध्ये हेलिकॉप्टर स्टंट पायलट म्हणून ‘द फ्लाइंग बुल्स’बरोबर काम केले होते. २०१२ मध्ये त्यांच्या विक्रमी उडीनंतर बॉमगार्टनर म्हणाले की, आवाजापेक्षा वेगाने प्रवास करणे, याचे वर्णन करणे कठीण आहे कारण तुम्हाला काहीही जाणवत नाही.” ते पुढे म्हणाले, “कधीकधी आपल्याला आपण किती लहान आहोत हे समजण्यासाठी खूप उंच जावे लागते.”