UP Husband Wife Fight Viral Video : जेवण बनवण्यावरून, जेवणाच्या चवीवरून नवरा-बायकोमध्ये झालेली भांडणं आपण अनेकदा पाहिली आहेत. मात्र, पत्नीला समोसा (सामोसा) दिला नाही म्हणून पत्नीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला जबर मारहाण केल्याचं प्रकरण कधी ऐकलं नसेल. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे. ही घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे.
उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील भगवंतपूर गावातील शिवम व संगीता यांचं तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. २२ मे रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर कुठल्याही नवविवाहीत जोडप्याप्रमाणे त्यांचाही नवा संसार सुरळीत चालू होता. परंतु, एके दिवशी केवळ एका समोशामुळे त्यांच्या आनंदावर विरझण पडलं आहे.
समोशावरून झाला वाद
संगीताने तिचा पती शिवमकडे गरमगरम समोशाची मागणी केली होती. परंतु, शिवम म्हणाला, “माझ्याकडे समोसा खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्याने समोसा आणला नाही. यावरून संगीताने शिवमबरोबर घरात मोठं भांडण केलं.
मुलीच्या नातेवाईकांकडून तिच्या पतीला मारहाण
संगीता शिवमबरोबर भांडण करून थांबली नाही. तिने तिच्या माहेरच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतलं. संगीताने तिच्या दोन मावशा सरला व विमला यांना, काका (मावशीचे पती) राम अवतार व धनीराम यांना फोन केले. त्यानंतर संगीताच्या माहेरचे नातेवाईक शिवमच्या घरी आले. त्यांनी शिवमला आणि त्याच्या पालकांना लाथा-बुक्क्यांनी, कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गावचे सरपंच अवधेश शर्मा यांनी पंचांची बैठक (ग्रामसभा) बोलावली. त्यांना आशा होती की पंचायत हे प्रकरण शांत करेल. परंतु, तसं झालं नाही. संगीताचे माहेरचे नातेवाईक ग्रामसभेला देखील आले आणि त्यांनी तिथे देखील शिवमला आणि त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिवमचे भाऊजी रामकरण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहगेत. व्हिडीओत दिसतंय की दोन कुटुंबांमधील लोक आपसांत हाणामारी करत आहेत. समोशावरून सुरू झालेला वाद मारहाणीत रुपांतरित झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ही हाणामारी पाहून गावकरी चकीत झाले आहेत.
दरम्यान, शिवम व त्याच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करण्यास सुरुवात केली आहे.