अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री यांचे छायाचित्र अटक करण्यात आलेल्या सनदी अधिकारी पूजा सिंघल यांना पाठवल्याबद्दल अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल केला. आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात सिंघल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच अटक केली होती.

 शहा व सिंघल हे दोघे रांचीमध्ये २०१७ साली एका कार्यक्रमात बोलत असलेले एक छायाचित्र दास यांनी अलीकडेच ‘शेअर’ केले होते. ‘लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि शहा यांची प्रतिष्ठा डागाळण्यासाठी’ त्यांनी हे छायाचित्र पाठवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  तिरंगा झेंडा घातलेल्या एका महिलेचे बदलेले (मॉफ्र्ड) चित्र शेअर करून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दलही ‘अनारकली ऑफ आरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले दास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. २००९-१० साली झारखंडमधील खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्त असतानाच्या काळात पूजा सिंघल यांनी ‘मनरेगा’तील निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली ईडीने बुधवारी त्यांना अटक केली होती.