चित्रपटांतील अश्लीलपणा हा समाजासाठी हानीकारक असल्याचे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते रविवारी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट संमेलनात बोलत होते. सर्जनशीलतेच्या अभावामुळे सध्याचे व्यवसायिक चित्रपट अयशस्वी ठरत आहेत. तसेच सध्याचे चित्रपटकर्ते आळशी झाले असून चित्रपटांचे विषय अनेक वादांना जन्म देणारे असल्याचेही नायडू यांनी सांगितले.
चित्रपट हा कलेचा अविष्कार असतो. मात्र, त्यासाठी दोन तास खर्ची घालणाऱ्या प्रेक्षकांना त्यामधून काहीतरी संदेश दिला जाणे अपेक्षित आहे. याशिवाय, चित्रपटातून आपल्या संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षणाचा संदेशही दिला जाऊ शकतो. आपल्याकडे सध्या निर्मिती होत असलेल्या चित्रपटांमध्ये वास्तववाद व सामाजिक विषय काहीसे मागे पडले आहेत. त्यामुळे मनोरंजन आणि सोशल इंजिनिअरिंगमध्ये तातडीने समतोल साधण्याची गरज उत्त्पन्न झाली असल्याचे नायडू यांनी सांगितले.
चित्रपटकर्त्यांनी व्यवसायिक चित्रपट बनवू नयेत, असे नाही. मात्र, त्यांनी आपल्या चित्रपटांमधून लैंगिक न्याय, मोठ्यांविषयी आदर, सर्जनशीलता आणि माणुसकी या मुल्यांचा प्रचार केला पाहिजे. तसेच आपला चित्रपट यशस्वी करण्यासाठी अश्लीलता आणि हिंसक गोष्टींचा आधार घेणाऱ्या चित्रपटकर्त्यांनी जुन्या चित्रपटांमधून शिकवण घ्यावी, असा सल्लाही यावेळी नायडू यांनी दिला. जुन्या चित्रपटांमध्ये हिंसा, अश्लीलता नसूनही अनेक वर्षे हे चित्रपट यशस्वीपणे चालले. त्यामुळे आताच्या काळात कारणमीमांसा आणि वास्तवाचे भान ठेवून चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे, असेही नायडू यांनी सांगितले.
यावेळी व्यंकय्या नायडू यांनी चित्रपटकर्त्यांना भारतीय मूल्ये आणि परंपरा जगापर्यंत पोहचतील, असे चित्रपट बनविण्याचे आवाहन केले. चित्रपट हा कोणतीही बंधने नसलेला धर्म आहे. भारतात दरवर्षी तब्बल दोन हजार चित्रपटांची निर्मिती होते, हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे त्याची भाषा वैश्विक आहे. त्यामुळे हे माध्यम सामाजिक आणि भौगोलिक मर्यादा ओलांडून प्रेक्षकांना एकत्र आणते, असे नायडू यांनी म्हटले.