अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पवित्र नगरीत दाखल झाले.

शनिवारपासून राममंदिर परिसरात तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वर्धापन सोहळ्याचा प्रारंभ यजुर्वेद पाठ आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाने झाला. शरयू नदी किनाऱ्यापासून राम मंदिरपर्यंतचा परिसर ५०० क्विंटल फुलांनी सजविण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामचरणी मस्तक टेकवले तसेच विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास महाराज यांचे आशीर्वादही घेतले. त्यानंतर ५६ पक्वान्नांचा नैवेद्या रामलल्लाला अर्पण करण्यात आला. या वेळी रामलल्लाचा दरबार फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.

हेही वाचा >>> Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

गेल्यावर्षी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पौष शुक्ल द्वादशी या दिवशी करण्यात आली होती. यावर्षी ही तिथी ११ जानेवारी रोजी आल्यामुळे शनिवारी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

ट्रस्टच्या माहितीनुसार, ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात गेल्यावर्षी उपस्थित राहू न शकलेल्या सामान्य लोकांचाही समावेश आहे. ‘अंगद टिळा’ येथे जर्मन हँगर तंबू उभारण्यात आला असून ५००० लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ़

शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलेले हे मंदिर आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा महान वारसा आहे. हे दिव्य आणि भव्य राम मंदिर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी एक महान प्रेरणा बनेल, असा विश्वास आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभू रामाचे भव्य मंदिर उभारणे हा जगातील दडपल्या गेलेल्या सभ्यता आणि संस्कृतीला लोकशाही आणि संवैधानिक पद्धतीने हक्क मिळवता येतात, हा संदेशही आहे. – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

प्रभू रामाच्या भक्तीने अयोध्या न्हाहून निघाली आहे. अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी ही प्रभू रामावरील अपार श्रद्धा दर्शवते. येथे पूर्णत: आनंदाचे वातावरण आहे. – सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, राममंदिर