करोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणारा ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये या प्रकाराचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची माहिती दिली.

“झिम्बाब्वे येथून परतलेला रुग्ण २८ नोव्हेंबर रोजी जामनगर येथे आला होता. श्वासोच्छवासाच्या काही आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर, त्याने शहरातील एका खाजगी प्रयोगशाळेत स्वतःची चाचणी केली आणि त्याचे निकाल सकारात्मक आले. त्यामुळे जामनगरच्या डेंटल कॉलेजमध्ये रिलायन्स फाऊंडेशनने उभारलेल्या कोविड-१९ रुग्णालयात त्याला ताबडतोब वेगळे ठेवण्यात आले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने केले. रुग्णाचे दोन नमुने एक जीबीआरसी आणि दुसरे एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले. एनआयव्ही कडून संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच ही व्यक्ती झिम्बाब्वेची नागरिक आहे तर त्याची पत्नी जामनगरची आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी माहिती दिली होती की कर्नाटकात ओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. दोघेही संक्रमित पुरुष असून त्यांचे वय ६६ आणि ४६ वर्षे आहे. त्यांच्यामध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दुसरीकडे, कर्नाटकात ओमायक्रॉनची दोन प्रकरणे आढळल्याच्या एका दिवसानंतर, राज्य सरकारने शुक्रवारी ६६ वर्षीय दक्षिण आफ्रिकन नागरिकाच्या चाचणी अहवालाची चौकशी करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे त्याला देश सोडण्याची परवानगी देण्यात आली. . बेंगळुरूला पोहोचल्यानंतर किमान १० दक्षिण आफ्रिकन प्रवासी बेपत्ता झाल्याच्या वृत्तांदरम्यान, सरकारने अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा शोध घेण्याचे, त्यांचा तात्काळ शोध घेण्याचे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.