अंतर्गत बंडाळी आणि हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या दक्षिण सुदानमध्ये मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसैन्यावर झालेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये लेफ्टनंट कर्नल आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे.
जुलै, २०११ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून दक्षिण सुदानला अंतर्गत बंडाळीने ग्रासले आहे. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पाठवलेल्या शांतीसेनेत भारतीय लष्कराचा सिंहाचा वाटा आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गुरमुक क्षेत्रातील जोंगलेई येथे शांतिसेना गस्तीवर असताना त्यांच्यावर बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाचजण शहीद झाले. त्यात लेफ्टनंट कर्नल आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. गेल्याच महिन्यात एका भारतीय जवानावर बंडखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, त्यात तो बालंबाल बचावला होता.