अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर मंगळवारी अधिकृतरित्या रामाचं मंदिर दर्शनासाठी सुरु झालं. पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक संख्येने भाविक उपस्थित राहिले. अयोध्येतल्या राम मंदिरात पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी दर्शन घेतलं. अयोध्येत भक्तांचा मेळा भरला आहे यात काहीही शंकाच नाही. अयोध्येत रामभक्तांची जी गर्दी झाली आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी अयोध्येत येणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी या दिवशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ जानेवारीला मंगळवारच्या दिवशी रामाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षा व्यवस्थेचा लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे आढावा घेतला. मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ नये आणि शिस्तीने सगळ्यांना दर्शन घेता यावं यासाठी ८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

भाविकांची प्रचंड गर्दी पाहता बाराबंकी पोलिसांनी रामभक्तांना पुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या ते बाराबंकी हे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. पोलिसांनी लोकांना यापुढे न जाण्याचे आवाहन केले आहे. अयोध्या धाममध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने सर्व वाहनांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येत भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब गर्दीमुळे राम लल्लाचे दर्शन थांबवले नसल्याचे स्पष्टीकरण अयोध्या पोलिसांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर मंदिरात पोहोचून रामल्लाचे दर्शन घ्यायचे आहे. पहाटे दोन वाजल्यापासून राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करताना दिसत होते.