कॅमब्रियन  कालावधीत उत्क्रांतीचा वेग हा आजच्यापेक्षा पाच पटींनी अधिक होता. याच काळात साध्या सजीवांपासून गुंतागुंतीचे सजीव तयार झाले, असे अ‍ॅडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. विज्ञानातील उत्क्रांती महाविस्फोट सिद्धान्तानुसार कॅमब्रियन काळात अनेक गुंतागुंतीचे सजीव एकदम उदयास आले, पण हे सजीव अचानक कसे अस्तित्वात आले हे कुणालाही स्पष्ट करता आले नव्हते. ते काम अ‍ॅडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या कूटप्रश्नाला डार्विनला पडलेला पेच असे म्हटले जाते. ५४० ते ५२० दशलक्ष वर्षांपूर्वी कॅमब्रियन स्फोटात हा उत्क्रांतीचा महाविस्फोट झाला असे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्यांच्या मते अनेक आधुनिक प्राणी याच काळात जन्माला आले. सजीवसृष्टीच्या निर्मितीनंतर अनेक प्राण्यांच्या प्रजाती तयार होण्याचा हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे, असे अ‍ॅडलेड विद्यापीठाचे संशोधक मायकेल ली यांनी म्हटले आहे. नेहमीपेक्षा ही उत्क्रांती जास्त वेगाने झाली होती असे डार्विनचे मत होते. चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवाणू, प्लँक्टन, बहुपेशीय प्राणी यांचे अस्तित्व होते, परंतु कॅंमब्रियन काळात त्यात अनेक नवीन सजीवांची भर पडली. त्याकाळातील एडिकारन प्राण्यांची प्रजात ऑस्ट्रेलियात होती, तिचे गूढ अजून कायम आहे. त्या काळातील काही सजीव हे थेट आजच्या काळातील सजीवांचे पूर्वज मानले जातात. उत्क्रांतीची ही गती आजच्या पाच पट अधिक होती. उत्क्रांतीच्या या वेगाचे स्पष्टीकरण डार्विनच्या सिद्धांताला छेद देणारे नाही. सूक्ष्मजीवांच्या जीवाश्मावरून उत्क्रांतीचा वेग वैज्ञानिक ठरवत असतात. काही जैविक बदल हे ३ कोटी वर्षांत झाले तर काही ५० लाख ते १ कोटी वर्षांत झाले असे सांगण्यात येते. कीटक, अँथ्रॉपॉडस, अराशनिडस व त्याच्या जवळ जाणाऱ्या सजीवांच्या जीवाश्मांचा अभ्यास यात करण्यात आला. ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
५४० ते ५२० दशलक्ष वर्षांपूर्वी कॅमब्रियन स्फोटात हा उत्क्रांतीचा महाविस्फोट झाला असे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्यांच्या मते अनेक आधुनिक प्राणी याच काळात जन्माला आले. सजीवसृष्टीच्या निर्मितीनंतर अनेक प्राण्यांच्या प्रजाती तयार होण्याचा हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे.