स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे पडलेले दिसतात. अनेकजण जबाबदारीने हे असे पडलेले झेंडे उचलतात. काहीजण सोयीस्करपणे या पडलेल्या झेंड्यांकडे दूर्लक्ष करतात. मात्र मागील नऊ वर्षांपासून एक तरुण हे पडलेले झेंड गोळा करण्याचं काम करत आहे. या तरुणाचे नाव आहे प्रियराजन सरकार.

पश्चिम बंगालमधील बाली येथे राहणाऱ्या प्रियराजन आज ३२ वर्षांचा आहे. वयाच्या २३ व्या वर्षापासून तो स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो तेथे पडलेले झेंडे गोळा करतो. लहानपणापासूनच अडखळत बोलण्याचा दोष असल्याने तो इतर मुलांमध्ये मिसळत नसे. त्यातूनच त्याला एकटेपण आले. एकदा रस्त्यावरुन चालत जात असताना त्याला भारताचा झेंडा चुरगळलेल्या अवस्थेमध्ये रस्त्यावर पडलेला दिसला. त्याचे त्याला खूप वाईट वाटले. त्याने तो झेंडा उचलला आणि त्याचा हा झेंडे गोळा करण्याचा प्रवास सुरु झाला. त्याच्या या झेंडा गोळा करण्याच्या सवयीवरुन सुरुवातीला त्याची अनेकांनी थट्टा केली मात्र तो मागे सरला नाही. तो मागील ९ वर्षांपासून हे काम करत आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी प्रियराजन आपला रपेट सुरु करतो. या फेरी दरम्यान तो रस्ते, गल्ल्या, कचरापेट्या इतकचं काय तर गटारामध्ये पडलेले झेंडेही गोळा करतो, असं ‘न्यूझपोल’ या बंगली मासिकाने आपल्या लेखामध्ये म्हटले आहे.

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे वेडे

मात्र प्रियराजन जेव्हा अशाप्रकारे झेंडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा लोक त्याला अनेकदा वेडा तसेच कचरा गोळा करणारा म्हणत हिणवतात. काही वेळा चोर समजून त्याला अनेकांनी हटकलेही आहे. बोलण्यात अडखळत असला तरी प्रियराजन दरवेळी लोकांना झेंड्याचे महत्व पटवून देण्यात यशस्वी ठरतो. “झेंडा हा आपला राष्ट्रीय सन्मान असून आपण प्राजसत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त विकत घेतलेल्या झेंड्याची नंतर काळजी घ्यायला हवी,” असं तो भेटणाऱ्या प्रत्येकाला समजावून सांगतो. “राष्ट्रीय सणांच्या दिवशी झेंड्याला वंदन करुन दुसऱ्या दिवशी तो कचऱ्यामध्ये फेकून देणारेच खऱ्या अर्थाने वेडे असतात,” असं प्रियराजन सांगतो.

बालपणी आल्या अनेक अडचणी

आपल्याला देशाबद्दल जे प्रेम वाटते त्याचे सर्व श्रेय प्रियराजन त्याच्या आईला देतो. वयाच्या तिसऱ्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपलेल्यानंतर प्रियराजन आणि त्याच्या तीन भावांचा आईने मोठ्या कष्टाने संभाळ केला. प्रियराजनला शाळेत दाखला मिळवताना खूप अडचणी आल्या. बोलताना अडखळणाऱ्या मुलाला शाळेत दाखल करुन घेण्यासाठी कोणीच तयार नव्हतं. शस्त्रक्रियेमुळे प्रियराजन बरा झाला असता पण शस्त्रक्रियेचा खर्च करण्यासाठी आईकडे पुरेसे पैसे नसल्याने त्याच्यावर इलाज करता आला नाही. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर प्रियराजनला शाळेत प्रवेश मिळाला. मात्र लहानपणापासून त्याला बोलताना येणाऱ्या अडचणींमुळे वर्गातील मुलांकडून टोमणे ऐकावे लागले. मात्र या सर्वांवर मात करुन तो स्थानिक फुटबॉल क्लबमधील उत्तम खेळाडू म्हणून नावारुपास आला.

राष्ट्रध्वज हा भारतमातेची साडी

लहानपणी एकदा प्रियदर्शनने आपल्या आईला रस्त्याच्या कडेला पडलेला झेंडा उचलताना पाहिले. त्यावेळी त्याने ‘आई तू हा झेंडा का उचलला?’ असा प्रश्न केला. तेव्हा प्रियदर्शनच्या आईने त्याला राष्ट्रध्वजाचे महत्व समजावून सांगितले. “झेंडा हा भारतमातेची साडी आहे. त्यामुळेच तुलाही कधी अशाप्रकारे झेंडा पडलेला दिसला तर तो नक्की उचल,” असं त्याच्या आईने त्याला सांगितले.

तरुणपणी भारतीय सेनेच्या बातम्या ऐकून आणि वाचून त्याचे झेंड्याबद्दलचे आकर्षण वाढले. भारतीय जवान जर भारताच्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी प्राण द्यायलाही तयार असतात तर एक सामान्य नागरिक म्हणून मी रस्त्यावर पडलेला झेंडा उचलण्याचे काम तर करुच शकतो असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने आईचा सल्ला ऐकत जेव्हा जेव्हा पडलेला झेंडा दिसला तेव्हा तो उचलला.

अन् इतरांनी त्याला साथ दिली

वयाच्या २३ व्या वर्षापासून प्रियराजन धुळीमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेले झेंडे उचलत आहे. आपल्या बालीमध्ये कोणत्याही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी झेंडा पडलेला दिसत कामा नये किंवा झेंड्याचा अपमान होता कामा नये असा निश्चय त्याने केला. यासाठी त्याने घरामध्ये एक मोठ्या बॉक्समध्ये रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत त्याने गोळा केलेले सर्व झेंडे त्याने या बॉक्समध्ये गोळा करुन ठेवले आहेत. प्रियराजनने एकट्याने पडलेले झेंडे गोळा करण्यास सुरुवात केली होती. मात्र आज अनेक तरुण त्याच्याबरोबर जोडले गेले आहेत. आज हे स्वयंसेवक स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडून ठिकाठिकाणी पडलेले झेंडे गोळा करतात. ही मुले पान थुंकल्याचे डाग असलेले, पायांचे ठसे असलेले, कचराकुंडीत पडलेले झेंडेही अगदी काळजीपूर्वक गोळा करतात.

राजकारणाशी संबंध नाही

देशाप्रती असणारे प्रेम आणि विचारसरणीमुळे मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याचे प्रियराजन सांगतो. स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या नादात दुसऱ्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अपमान करणे प्रत्येक भारतीयांना स्वत:ही थांबवायला हवे आणि इतरांनी असे करण्यापासून परावृत्त करायला हवे असं प्रियराजन सांगतो.