scorecardresearch

धक्कादायक: मुलाच्या जामिनासाठी महिलेला करावा लागला पोलिसाला मसाज; बिहारमधली लाजिरवाणी घटना

मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पोलिसानं थेट पोलीस ठाण्यात बसूनच महिलेकडून मसाज करून घेतला आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही संतापजनक घटना बिहारमधील सहरसा येथील एका पोलीस ठाण्यात घडली आहे. तर शशिभूषण सिन्हा असं आरोपी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तो सहरसा येथील नौहट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरहर ओपी येथे तैनात होता. दरम्यान त्यानं एका मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात महिलेकडून मसाज करून घेतला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

संबंधित व्हिडीओत आरोपी पोलीस अधिकारी सिन्हा हा अर्धनग्न अवस्थेत बसल्याचं दिसत आहे. तर एक महिला त्याचा मसाज करत आहे. तर दुसरी महिला त्याच्या पायाजवळ बसली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला आपल्या मुलाला जामीन मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी आरोपी पोलीस शशिभूषण सिन्हा यानं संबंधित महिलेला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात मसाज करण्यास सांगितलं. तसेच तुमचा मुलगा लवकरच तुरुंगातून बाहेर येईल, असं आश्वासनही त्यानं महिलेला दिलं.

मसाज सुरू असतानाच आरोपी पोलीस अधिकारी शशिभूषण सिन्हा यानं एका वकिलाला फोन केला आणि संबंधित मुलाला जामिनावर सोडवण्यास सांगितलं. त्यासाठी सोमवारी दोन महिलांना तुमच्याकडे पाठवतो. त्या गरीब आणि गरजू आहेत, असंही पोलीस फोनवर बोलताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच सहरसाचे पोलीस अधीक्षक लिपी सिंग यांनी शशिभूषण सिन्हा यांना निलंबित केलं आहे. तसेच या घटनेची सविस्तर चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: For seeking bail to son police officer ask woman to massage him viral video in bihar rmm

ताज्या बातम्या