दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात मिळणाऱया जेवणाचा खालावलेला दर्जा आणि महाराष्ट्रीय जेवण न मिळाल्याने शिवसेना खासदारांनी सदनाच्या कॅण्टीन कर्मचाऱयाच्या तोंडात पोळी कोंबल्याच्या वादानंतर आता सदनात मराठमोळे जेवण मिळण्यास सुरूवात झाली आहे.
राज्याच्या काही खासदारांनी शिफारस केलेल्या ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ या बचतगटाला महाराष्ट्र सदनातील कॅण्टीन सुविधा सांभाळण्यास दिली असून आता सदनात ‘अस्सल’ मराठमोळे जेवण मिळण्यास सुरूवात झाली आहे. प्रभा रावत या बचतगटाच्या प्रमुख असून त्यांच्या देखरेखीखाली बचतगटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनातील जेवणाची सुविधा सांभाळत आहेत.
गेल्या शुक्रवारपासून या बचतगटाने महाराष्ट्र सदनाचे कॅण्टीन सांभाळण्यास सुरुवात केली आणि यावेळी मेन्यूत वरण-भात, शिरा इत्यादी मराठमोळे पदार्थ मिळण्यास सुरुवात झाली. कॅण्टीनमध्ये वावरणारे कर्मचारी आणि वेटर्स सर्व मराठी आहेत आणि सदनात येणाऱया प्रत्येकाशी आवर्जुन मराठीतच बोलतात. या बचतगटाची टीम सध्यातरी सदनाच्या मानाने कमी असल्याने नेमकेच मराठमोळे पदार्थ सुरू करण्यात आले आहेत परंतु, कालांतराने मेन्यूत आणखी वाढ होईल असे बचतगटाच्या प्रमुख प्रभा रावत म्हणाल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदनात १०० रुपयांत शाकाहारी थाळी मिळत आहे यामध्ये सुखी भाजी, रस्सा भाजी, वरण-भात, चपाती, तर मांसाहारी जेवणासाठी आणखी ५० रुपये खर्चून कोल्हापूरी पद्धतीने केलेले चिकन सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Force feeding fasting youth maharashtrian food returns to sadan via a self help group
First published on: 29-07-2014 at 12:59 IST