लष्करातील काही अधिकारी फेसबुकवरून या दलाबद्दलची अत्यंत संवेदनक्षम माहिती उघड करीत असल्याची कुणकुण लागल्याने लष्करी गुप्तचर यंत्रणेने त्याचा तपास केला असता या प्रकारांत कर्नल, मेजर आणि लेफ्टनंट दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांचा हात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एका महिलेशी स्पष्टपणे लैंगिक संभाषण करण्याच्या मोबदल्यात सदर अधिकारी लष्कराच्या तळांच्या ठिकाणांची माहिती देत असल्याची बाब उघड झाली आहे.
याबाबत लष्करी गुप्तचर यंत्रणेने ११ ऑगस्ट रोजी लष्कराच्या सर्व कमांड मुख्यालयांना आणि स्ट्रॅटजिक फोर्सेस कमांड अ‍ॅण्ड इंटिग्रेटेड संरक्षण कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये आणखीही काही अधिकारी गुंतलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची कृत्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत, त्याचप्रमाणे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांचे सरळसरळ उल्लंघन आहे.
युद्धाच्या व्यूहरचनेबाबतची माहिती सदर अधिकारी फेसबुकवरून पुरवीत होते, असे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. कर्नल पदावरील अधिकाऱ्याची मध्य प्रदेशातील महू येथील लष्कर युद्ध महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे, तर दोन राजपूत तुकडीचा एक मेजर आणि तीन राजपूत आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्सचा एका लेफ्टनंट यांचीही ओळख पटली असून त्यांच्या नावांचा उल्लेख लष्करी गुप्तचर यंत्रणेने पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीतून असे आढळले आहे की, सदर तीन अधिकाऱ्यांनी स्वत:ची ओळखच नव्हे तर लष्करातील अत्यंत संवेदनक्षम माहितीही उघड केली आहे आणि त्या बदल्यात भारतीय वंशाच्या एका संशयास्पद व्यक्तीशी अगदी स्पष्टपणे लैंगिक संभाषण केले आहे. सुरक्षाविषयक शिष्टाचाराचे उल्लंघन करीत असल्याची जाणीव असतानाही हे अधिकारी आपल्या कामाच्या वेळेत असे उद्योग करीत असल्याचेही आढळले आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांचे असे कृत्य ते ज्या पदावर आहेत आणि त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्याला शोभादायक नाही त्यामुळे अशा प्रकारची कृत्ये करण्यापासून या अधिकाऱ्यांना परावृत्त करावे, अशा सूचना कमांडना देण्यात आल्या आहेत. या कृत्यामुळे लष्करातील संवेदनक्षम माहितीशीही तडजोड होऊ शकते, असेही पत्रात म्हटले आहे.
लष्करातील अधिकारी आणि एक महिला फेसबुकवर चॅट करीत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी हेरले आहे, असे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने २० जुलै रोजी दिले होते. सदर महिला शत्रुपक्षाची हस्तक असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. चॅट करताना सदर महिला लष्कराच्या तळांच्या ठावठिकाण्याबाबतची माहिती विचारत असल्याचेही आढळले आहे. लष्कराच्या मुख्यालयातून अशा प्रकारचे चॅटिंग होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर लष्करी गुप्तचर यंत्रणेने पत्र पाठविले असून या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Force officer give secret information against sex chatting
First published on: 30-08-2015 at 01:46 IST