नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने केलेली लष्करी कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधात होती, हा प्रमुख संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३५हून अधिक देशांना भेटी देणार आहेत. सात शिष्टमंडळांपैकी तीन शिष्टमंडळातील सदस्यांना मंगळवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी तपशीलवार माहिती देत ठोस भूमिका मांडण्याची सूचना केली.
ही शिष्टमंडळे विविध देशांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे कुठल्या देशातील सरकारसमोर कुठले मुद्दे प्रामुख्याने मांडले पाहिजेत, याची दिशा मिस्राींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये निश्चित केल्याचे समजते. संसदेत झालेल्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी तीन शिष्टमंडळांतील सदस्यांना प्रामुख्याने पाकिस्तानकडून भारतासंदर्भात पसरवल्या गेलेल्या गैरसमजांची माहिती दिली असून त्यासंदर्भात बाजू मांडण्याची सूचना केली. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी लष्करी कारवाई केली गेली. ही कारवाई पाकिस्तानी नागरिक वा लष्कराविरोधात नव्हती, हा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वतीने दिला जाणार आहे. पाकिस्तानमधून दहशतवादाला कसे खतपाणी घातले जाते, हा दुसरा प्रमुख मुद्दा अधोरेखित केला जाणार असल्याचे समजते.
युसूफ पठाणऐवजी अभिषेक बॅनर्जी
● सर्वपक्षीय शिष्टमंडळांमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या तृणमूल काँग्रेसने मंगळवारी घूमजाव केले. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार युसूफ पठाणऐवजी आता पक्षाचे वरिष्ठ नेता व खासदार अभिषेक बॅनर्जी हे संजय झा यांच्या शिष्टमंडळाचे सदस्य असतील.
● केंद्र सरकारने पक्षाला न विचारता शिष्टमंडळात विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश करणे योग्य नव्हे. खासदारांचा समावेश करण्यापूर्वी पक्षाला विचारायला हवे होते, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली होती. मात्र, देशाचा मुद्दा असल्याने आम्ही शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊ, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी स्पष्ट केले होते.
या मुद्द्यांची मांडणी
● पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताविरोधात रसद पुरवत असून विविध स्तरांवर पाठिंबा देत आहे, हा मुद्दा वेगवेगळ्या देशांच्या सरकारांसमोर मांडला जाणार असून त्यादृष्टीने शिष्टमंडळातील सदस्यांना माहिती देण्यात आल्याचे समजते.
● ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत व पाकिस्तान यांच्यामधील शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थी केलेली नाही. पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केल्यानंतर भारताने शस्त्रसंधी केल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाकडून मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतून चुकीचे मुद्दे मांडले जात आहेत. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी भारत आपली बाजू मांडणार असल्याचेे भाजप नेते एस. एस. अहलुवालिया म्हणाले.