Prajwal Revanna Convicted: कर्नाटकच्या हासन लोकसभेचे माजी खासदार आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने आज हा निकाल दिला. घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णांना दोषी ठरवले गेले आहे. न्यायालयाने आज (शुक्रवार, दि. १ ऑगस्ट) आपला निकाल सुनावताच प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयातच रडू कोसळले असे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. दरम्यान २ ऑगस्ट रोजी न्यायलयाने निकाल सुनावला.

लोकसभेची निवडणूक सुरू असताना २०२४ मध्ये प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच सदर प्रकरण बाहेर आल्यामुळे एकच गदारोळ उडाला होता. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता १४ महिन्यांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.

माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णावर बलात्काराची चार प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविले गेले आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पीडितांच्याही तक्रारी घेऊन महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्ज्वलवर कलम ३७६ (२) (न) नुसार वारंवार बलात्कार करणे, कलम ५०६, कलम ३५४ अ, ब आणि क नुसार विविध गुन्हे दाखल केले होते.

विशेष सरकारी वकील अशोक नायक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, यावर्षी २ मे रोजी सुरू झालेल्या सुनावणीत २६ साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यात आली. खटला पूर्ण करण्यासाठी २८ तारखा दिल्या गेल्या. यात युक्तिवादाच्या तारखांचाही समावेश आहे.

ड्रायव्हरने प्रकरण उघडकीस आणले

रेवण्णाचा माजी वाहन चालक कार्तिक एन. (वय ३४) हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असून त्यानेच हे प्रकरण बाहेर आणले होते. प्रज्ज्वल रेवण्णाचे अश्लिल व्हिडीओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिक एन. वरही गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी कार्तिकने सांगितले की, त्याने एकदा प्रज्ज्वल रेवण्णाचा मोबाइल चोरून पाहिला होता. त्यात या प्रकाराचा उलगडा झाला.

माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याचा वाहन चालक कार्तिक एन.

व्हिडीओ बाहेर कसे आले?

२०२२ साली कार्तिक आणि प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या कुटुंबियांचे जोरदार भांडण झाले. ज्यामुळे कार्तिकने त्यांची नोकरी सोडली. कार्तिकने पुढे सांगितले की, प्रज्ज्वल रेवण्णाच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह त्यानेच भाजपाचे नेते आणि वकील जी. देवराजे गौडा यांना दिला होता. त्यांनी हासन विधानसभा मतदारसंघातून प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताजी अपडेट

शनिवारी (२ ऑगस्ट) विशेष न्यायालयाने आपला निकाल सुनावताना प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.