टोक्यो : एक -एक इंच जमिनीसाठी अनेक देशांमध्ये युद्ध होत असताना तीन आठवडय़ांपूर्वी जपानच्या समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एका छोटय़ा नव्या बेटाची निर्मिती झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बेट फार काळ टिकणार नाही. दक्षिणेकडील इवो जिमाच्या किनारपट्टीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मालिकेला २१ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० दिवसांत ज्वालामुखीची राख आणि खडक येथील उथळ समुद्रतळावर गोळा झाले. त्याचे टोक समुद्राच्या पृष्ठभागावर आहे.

हेही वाचा >>> दररोज चार तासांचा युद्धविराम; इस्रायलची मान्यता, अमेरिकेचा दावा

जपानच्या हवामानशास्त्र संस्थेच्या ज्वालामुखी विभागातील विश्लेषक युजी उसुई यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुमारे १०० मीटर व्यासाचे आणि समुद्रापासून २० मीटर उंचीचे नवीन बेट तयार झाले आहे. इवो जिमाजवळ ज्वालामुखीची सक्रियता वाढली आहे. अलीकडच्या काही वर्षांत समुद्राखाली अनेक उद्रेक झाले आहेत. परंतु नवीन बेटाची निर्मिती ही एक महत्त्वाची घटना आहे, असे उसुई यांनी सांगितले. लाटांच्या माऱ्यामुळे नवीन बेट आता काहीसे आकुंचन पावत आहे. तज्ज्ञ येथील परिस्थितीचे विश्लेषण करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.