Chinmoy Das gets bail : बांगलादेशच्या न्यायालयाने बुधवारी माजी इस्कॉनचे नेते चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे, बांगलादेशमधील ‘द डेली स्टार’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

२५ ऑक्टोबर रोजी चत्तोग्राम येथे लालदिघी मैदानात एका रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजाच्या वर भगवा झेंडा फडकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर दास यांना चितगोंग न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांना कोठडीत पाठवण्यात आले. या अटकेनंतर दास यांच्या सुटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती.

चिन्मय कृष्ण दास कोण आहेत?

दास हे बांगलादेश संमिलिता सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते म्हणून काम करतात, हा गट अल्पसंख्यांकाचे हक्क आणि सुरक्षा यासाठी काम करतो. तसेच दास हे बांगलादेशात हिंदू (सनातनी) समुदायाचे कट्टर समर्थक राहिले आहेत. हिंदू अल्पसंख्यांक समाजाच्या मुद्द्यांवर ते सातत्याने भूमिका घेत आले आहेत.

२५ ऑक्टोबर रोजी चित्तागोंग येथे आणि २२ नोव्हेंबर रोजी रंगपूर येथे आयोजित केलेल्या भव्य रॅलीमुळे दास हे चर्चेत आले होते. त्यांच्या या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. तसेच या रॅलींमुळे देशभरात राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाल्या होत्या.

दास हे चित्तागोंगमधील सातकानिया उपजिल्ह्यातील रहिवासी आहेत. तसेच २०१६ ते २०२२ पर्यंत त्यांनी इस्कॉनचे चित्तगाव विभागीय सचिव म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या धार्मिक विषयांवरील भाषणांमुळे त्यांना लहान वयातच चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यांना ‘शिशु बोक्ता’ किंवा ‘बाल वक्ता’ असे टोपणनाव देखील मिळाले होते, असे बांगलादेशी माध्यमांनी म्हटले आहे.